नोकरीच्या अमिषाने बांग्लादेशी तरुणींना ढकलले शरीर विक्रयाच्या व्यवसायात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:03 PM2020-12-20T23:03:08+5:302020-12-20T23:06:50+5:30
नोकरीचे अमिष दाखवून बांग्लादेशी तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेणाऱ्या मोहन उर्फ सनातन सुरेंद्र बर्मन याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शनिवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: नोकरीचे अमिष दाखवून बांग्लादेशी तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेणाºया मोहन उर्फ सनातन सुरेंद्र बर्मन (३३, रा. हाजीमलंग रोड, कल्याण ) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्याच्या तावडीतून १९ ते २५ वयोगटातील चार पिडित तरुणींची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कल्याण परिसरातील खून तसेच सेक्स रॅकेटमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहन हा त्याच्या अन्य एका साथीदारासह बांग्लादेशातून नोकरीच्या अमिषाने फसवणूकीने आणलेल्या तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १९ डिसेंबर रोजी या परिसरात धाड टाकून कडलग यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक भगवान औटी, जमादार सुनिल चव्हाणके आणि हवालदार अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून चार पिडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. त्यांना अनैतिक संबंधासाठी बांगलादेशातून आणल्याची कबूलीही त्याने या पथकाला दिली. त्याच्याविरुद्ध कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आता कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.