शेअर्समध्ये गुंतवणुकीचे अमिष, वृद्धाची ४२ लाखांनी फसवणूक
By जितेंद्र कालेकर | Published: February 29, 2024 09:11 PM2024-02-29T21:11:55+5:302024-02-29T21:15:13+5:30
याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी दिली.
ठाणे: फेसबुकद्वारे प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली बिसदेव छाबरा (रा. कोलशेत, ठाणे) या ७४ वर्षीय जेष्ठ नागरिकाची ४२ लाख १५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी दिली.
ठाण्यातील कोलशेत रोड परिसरात राहणारे छाबरा हे १४ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या घरी असतांना त्यांना एका भामटयाने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर संपर्क केला. शेअर ट्रेडिंग कसे करायचे? स्टॉक मार्केटमध्ये कोणते शेअर्स खरेदी केल्यास जास्तीत जास्त फायदा होईल, याची माहिती जाणून घ्यायची असल्यास व्हॉटसअॅप गृपमध्ये सहभागी व्हा, अशी पोस्टही टाकून एक लिंक पाठवली. छाबरा यांनाही शेअर ट्रेडिंगबाबत सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मोबाईलवरुन ही लिंक स्वीकारली.
धारण, १४ डिसेंबर २०२३ ते ६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये याच भामटयाने फेसबुकवरुन दिलेल्या लिंकद्वारे त्यांना ‘इन्वेस्टर्स अलायन्स’ या व्हॉटसअॅप गृपमध्ये समाविष्ट केले. त्यानंतर गृप अॅडमिन डॉ. कुणाल सिंग याने त्यांना या व्हॉटसअॅप गृपद्वारे प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या सांगण्याप्रमाणे व्हॉटसअॅप गृप असिस्टंट लिंडा मेहता, मेरा काना यांनी एका लिंकद्वारे त्यांना समाविष्ट करुन त्या लिंकच्या आधारे ‘स्कायरीम कॅपिटल’ अॅपमध्ये त्यांचे अकाऊंट आणि पासवर्ड तयार करण्यास भाग पाडले. त्यानंतर स्कायरिम कॅपिटल या गृपमधील मार्गदर्शक असलेल्याने छाबरा यांच्याकडून सुरुवातीला एक लाख पाच रुपये घेतले. त्यानंतर एकापाठोपाठ आॅनलाईन द्वारे त्यांनी काही रकमा घेऊन त्यांची ४२ लाख १५ हजार रुपये ऑनलाईन फसवणूक केली.
हे पैसे किंवा त्यापोटीचा नफा अशी कोणतीही रक्कम त्यांना या भामट्यांनी परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली कापूरबावडी पोलिस ठाण्यात या सायबर भामटयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.