गुंगीचे औषध देऊन लुटणारा अटकेत
By admin | Published: June 1, 2017 05:38 AM2017-06-01T05:38:01+5:302017-06-01T05:38:01+5:30
म्पो चालकाला ज्युसमध्ये गुंगीचे औषध देवून लुटणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : टेम्पो चालकाला ज्युसमध्ये गुंगीचे औषध देवून लुटणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारात चालकाच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. त्याच्याविषयी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कोपरी गावातून त्याला अटक केली.
बिलाल सही खान (५०) असे पोलिसांनी अटक केलेल्या लुटारुचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. त्याने सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका टेम्पो चालकासोबत ओळख करुन ज्युसमध्ये गुंगीचे औषध दिले होते. यामुळे टेम्पो चालक बेशुध्द झाल्यानंतर त्याने टेम्पो चालकाच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून पळ काढला होता. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्याच्याविषयी गुन्हे शाखा कक्ष एकच्या पथकाला माहिती मिळाली होती. यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त नितीन कौसडीकर, वरिष्ठ निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विक्रम बनसोडे, अविनाश माने, योगेश तांबोळी, उपनिरीक्षक भगवान तायडे, हवालदार दीपक पाटील, बाबाजी थोरात, विवेक कठाळे, राहुल केळगंद्रे यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी खान हा कोपरी गावालगतच्या परिसरात आला असता पथकाने त्याला अटक केली. त्याने अशा प्रकारे इतरही गुन्हे केल्याची शक्यता असल्याने अधिक चौकशीसाठी सानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.