भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय डबघाईला; केंद्र व राज्य सरकारचा निषेध करीत व्यापाऱ्याने केली कापडाची होळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 05:44 PM2021-06-23T17:44:32+5:302021-06-23T17:47:21+5:30
Bhiwandi News : गेल्या वर्षीपासून कोविडच्या प्रादुर्भावाने झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायाप्रमाणे कापड व्यवसाय देखील डबघाईला आले आहे.
नितिन पंडीत
भिवंडी - यंत्रमाग व कापड व्यवसायात आलेल्या मंदीकडे राज्य व केंद्र सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी शहरातील कल्याणरोड येथील पॉवरलूम मालकाने आपल्या कारखान्यातील कापड रस्त्यावर जाळून कापडाची होळी केली व केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. यंत्रमाग व्या सायिकाने मंगळवारी केलेल्या या कापडाच्या होळीची व्हिडीओ समाज माध्यमांवर देखील चांगलेच व्हायरल झाले आहेत.
गेल्या वर्षीपासून कोविडच्या प्रादुर्भावाने झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायाप्रमाणे कापड व्यवसाय देखील डबघाईला आले आहे. अशा स्थितीत केंद्र व राज्य शासनाने कापड व्यवसायाकडे लक्ष देऊन सवलत देणे अपेक्षित होते. सध्या देशात बांगलादेश मार्गे पाकिस्तान व चायनाचे स्वस्त कापड येते. त्याच्यावर केंद्र सरकार कोणतेही कर लावत नाही. कापडावर केंद्र सरकार विविध कर लावून देशातील उत्पादित कापडाच्या किमती वाढवीत आहे. तसेच राज्य सरकारने विजेच्या किमती वाढविल्याने पॉवरलूम मालकांचे कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीत केवळ या व्यवसायावर लाखो लोकांचा उदरनिर्वाह सुरू आहे म्हणून हा व्यवसाय सुरू ठेवणे भाग पडले आहे, असे मालकवर्ग सांगत आहे.
व्यवसायाकडे केंद्र व राज्य शासनाने लक्ष द्यावे याकरीता अनेक पत्र व्यवहार स्थानिक राजकारणी व व्यापाऱ्यांनी केले आहे. असे असताना शासन आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत कल्याणरोडचे यंत्रमाग व्यावसायिक जाहिद मुख्तार यांनी आपल्या कारखान्यातील कापडाची होळी करत केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला. डबघाईला आलेल्या यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी विशेष योजना राबवून यार्नमधील होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अन्यथा भिवंडी प्रमाणे मालेगाव, इचल करंजी त्याचबरोबर देशभर यंत्रमाग व्यावसायिक अशा प्रकारे आंदोलने करतील असा इशारा देखील शहरातील यंत्रमाग व्यावसायिकांनी दिला आहे.