मनसेचा फेरीवाल्यांविरुद्ध राडा, दादर, कुर्ला, अंधेरीतून पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 07:09 AM2017-10-22T07:09:24+5:302017-10-22T07:11:16+5:30
राज ठाकरे यांनी दिलेली १५ दिवसांची मुदत संपताच, त्यांच्या समर्थकांनी शनिवारी ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आदी रेल्वे स्थानकांच्या बाहेरील फेरीवाल्यांकडे आपला मोर्चा वळवला.
ठाणे/कल्याण : राज ठाकरे यांनी दिलेली १५ दिवसांची मुदत संपताच, त्यांच्या समर्थकांनी शनिवारी ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आदी रेल्वे स्थानकांच्या बाहेरील फेरीवाल्यांकडे आपला मोर्चा वळवला. मनसैनिकांनी फरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड करून, फेरीवाल्यांना मारहाणही केली. मनसैनिक माघारी वळताच फेरीवाल्यांनी लागलीच पुन्हा बस्तान बसवले. त्यामुळे मनसेचे आंदोलन हा निव्वळ फोटो स्टंट ठरला.
राडा करणा-या मनसैनिकांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. काही ठिकाणी पोलिसांसमोरच हा प्रकार सुरू होता, असे फेरीवाल्यांनी सांगितले. रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांना १५ दिवसांत हटवा अन्यथा मनसेच्या स्टाइलने हटवू, असा इशारा दिला होता. तरीसुद्धा फेरीवाले हटत नसल्याचे पाहून १६ व्या दिवशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांवर हल्लाबोल करीत त्यांच्या वस्तूंची फेकाफेक केली, तोडफोड केली आणि फेरीवाल्यांना हुसकावून लावले.
ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५० मनसैनिकांनी स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली. फेरीवाल्यांना त्यांनी मारहाण केली. जाधव यांच्यासह ६ ते ७ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, कोणालाही अटक केली नाही. कल्याणमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर रेल्वे सुरक्षा बलाने फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. कल्याण स्थानक परिसरात आंदोलन केल्याबद्दल मनसेचे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेने ठाणे व कल्याण रेल्वे स्थानकात आंदोलन केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी डोंबिवली परिसरातील फेरीवाले हटवले. मनसे आंदोलनापूर्वीच दादर, कुर्ला आणि अंधेरी येथील पुलासह परिसरात फेरीवाले शनिवारी गायब झाले. -वृत्त/३
मनसेचे फेरीवाल्यांविरुद्धचे आंदोलन निषेधार्ह असून, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू. आंदोलन करण्यास प्रोत्साहन देणाºयांच्या विरुद्धही न्यायालयात जाणार आहोत, असे ठाणे जिल्हा हॉकर्स युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी सांगितले.