स्थायी समिती सभापतीपदी मदन नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 03:27 AM2018-10-04T03:27:39+5:302018-10-04T03:28:08+5:30
भिवंडी पालिका : भाजपाने घातला बहिष्कार, शिवसैनिकांनी केला जल्लोष
भिवंडी : स्थायी समिती सभापतीची बुधवारी निवडणूक झाली. या निवडणुकीवर भाजपाच्या उमेदवारांसह सहा सदस्यांनी गैरहजर राहून अघोषित बहिष्कार घातला होता. त्यामुळे काँग्रेस-शिवसेना युतीचे उमेदवार मदन नाईक यांचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले. पालिकेबाहेर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
महापालिकेत काँग्रेस-शिवसेना युतीची सत्ता असून यापूर्वी स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे इम्रान खान होते. काँग्रेस व शिवसेना यांच्यात परस्परात ठरलेल्या चर्चेनुसार त्यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे २०१८-१९ या वर्षासाठी स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या वतीने जेष्ठ नगरसेवक नाईक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या समोर भाजपाचे नगरसेवक नित्यानंद नाडार यांनी अर्ज दाखल केला होता. सकाळी अकरा वाजता महापालिका सभागृहात पिठासन अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. मात्र जोंधळे हे महापालिकेत उशिरा आल्याने निवडणूक प्रक्रियेस विलंब झाला. त्यामुळे सभागृहात उपस्थित भाजपाच्या नगरसेवकांनी ही निवडणूक रद्द करून नवीन अजेंडा काढून सभापतीची निवडणूक घ्यावी,अशी विनंती आयुक्तांकडे केली. परंतु जोंधळे यांनी ही निवडणूक दुपारी दोन ेपर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांसह सहा नगरसेवक सभागृहाबाहेर पडले. नाईक यांना १० मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी भाजपाचे नाडार निवडणुकीला गैरहजर राहिले.