मधुकर मोहापे, माधुरी भोईर यांना जिल्हास्तरीय कृषिभूषण पुरस्कार
By admin | Published: July 3, 2017 06:21 AM2017-07-03T06:21:14+5:302017-07-03T06:21:14+5:30
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाद्वारे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाद्वारे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात कल्याण तालुक्यातील आणे येथील मधुकर धर्माजी मोहोपे यांना कृषिभूषण पुरस्कार, तर भिवंडीच्या वेहेळे येथील माधुरी महादेव भोईर यांचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रगतशील शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय कृषिभूषण व जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी गौरवण्यात आले. जिल्हा नियोजन भवनात पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी आमदार रवींद्र फाटक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय, कल्याणचे कान्हा लोणे, भिवंडीचे विनायक पाटील, आकाश बरफ, अंबरनाथमधील सदानंद सुरोशे, सुरेश हंबीर, अमित बसवंत, किसान पारधी (शहापूर), मोतीराम कडव, दत्तू शीद (मुरबाड) या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती तसेच उत्तम प्रकारे भाजीपाला पिकवणे, शासनाच्या योजनांचा लाभ घेणे, कृषी यांत्रिकीकरण, कृषी पर्यटन इत्यादी कारणांसाठी गौरवण्यात आले.
जिल्ह्यात शेतीमध्ये विविध प्रयोग झाले पाहिजेत, तसेच केवळ भातावर अवलंबून न राहता भाजीपाला तसेच इतर पिके कशी घेता येतील, हे पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यात जलयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनीदेखील आपल्या भाषणात जिल्हा परिषद शेती आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. याप्रसंगी कृषीविषयक पुस्तिकांचे विमोचन करण्यात आले. भाजीपाला लागवड, रोगनियंत्रण अशी माहिती या पुस्तिकेत आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते पीओएस मशिन्सचे वाटपही झाले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा अधीक्षक महावीर जंगटे उपस्थित होते.