सदानंद दाते यांनी आयुक्तालयाच्या रोवलेला पाया उंचावण्याची मधुकर पांडेंवर जबाबदारी
By धीरज परब | Published: December 14, 2022 05:43 PM2022-12-14T17:43:57+5:302022-12-14T17:44:09+5:30
दाते यांची नियुक्ती झाली तेव्हा पोलीस आयुक्तालय म्हणून इमारत सुद्धा नव्हती.
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांनी जी पाया भरणी केली आहे तो पाया पुढे आणखी उंच व भक्कम करण्याची मोठी जबाबदारी नवनियुक्त पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्यावर आली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यरत झाले आणि सप्टेंबर २०२० मध्ये पहिले पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांनी कार्यभार स्वीकारला होता . अपुरे मनुष्यबळ , तुटपुंजी वाहने व यंत्रणा त्यातच ग्रामीण पोलीस खात्याची मानसिकता अश्या परिस्थितीत सरकारने व नागरिकांनी दातेंवर दाखवलेला विश्वास त्यांनी बऱ्याच प्रमाणात सार्थ ठरवला.
दाते यांची नियुक्ती झाली तेव्हा पोलीस आयुक्तालय म्हणून इमारत सुद्धा नव्हती. सुरवातीचे काही दिवस तर दाते यांनी दोन्ही शहरातील विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून कारभार पहिला . त्यानिमित्ताने त्यांना शहराची व शहरातील गुन्हेगारी तसेच उपस्थित पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांची सुद्धा कार्यपद्धती निदर्शनास आली . दातेंनी शासन कडे पाठपुरावा करून आयुक्तालयाची निधी , वाहने , यंत्रणा , पोलीस बळ तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान शक्य तेवढे उपलब्ध करून घेतले . पोलीस आयुक्तालयाची जागा ताब्यात घेतली.
शहरातील गुन्हे रोखण्यासाठी तसेच गुन्ह्यांची उकल होण्यासाठी एक सीसीटीव्ही कॅमेरा शहरासाठी मोहीम राबवत लोकसहभागातून शहर कॅमेऱ्याच्या नजरेखाली आणले. त्यातून खून , दरोडा पासून अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आली. गुन्ह्यांचा तपास व आरोपीना शिक्षा होणे ह्यावर जातीने लक्ष दिले . तपासी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दरमहा पारितोषिक देऊन कौतुक केले. तर तक्रारी आलेल्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी आणि कार्यवाहीचा सुद्धा बडगा उगारला. त्याने आयुक्तलयाची कामगिरी उंचावली. कार्यालयीन वेळेत लोकांना थेट भेटण्यासह व्हॉट्स अप व भ्रमणध्वनी वरून सामान्य लोकांना सुद्धा प्रतिसाद मिळू लागल्याचा चांगला परिणाम झाला.
विविध पोलीस सेल, नियंत्रण कक्ष आदी कार्यान्वित करतानाच गुन्हे दाखल न करून घेण्याची मानसिकता त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला . वाहतूक सुधारणा व शिस्त लावणे , कायदा सुव्यवस्था राखणे ह्यावर देखील लक्ष दिले . मात्र काही उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बड्या राजकारणी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना मात्र दातेंनी पाठीशी घातले या बद्दल त्यांना टीकेला सामोरे जावे लागले . काही वादग्रस्त राजकारणी व त्यांच्या समर्थकांना वेगळा न्याय आणि सामान्यांना वेगळा न्याय असे प्रश्न यामुळे उपस्थित केले गेले.
दाते यांची बदली दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून शासनाने केली असल्याने त्यांच्या जागी मधुकर पांडे यांची नवे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे . तसा पांडे यांना पूर्वी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असतानाचा परिसराचा अनुभव आहे . परंतु दाते यांच्या कार्यकाळात झालेल्या चांगल्या उपक्रमांना पुढे कायम ठेवण्याची जबाबदारी पांडे यांच्यावर आहे . गैरप्रकार रोखण्यासह तसे करणाऱ्या अधिकारी व पोलिसांना आणखी जरब बसेल अशी कार्यवाही पांडे यांच्या कडून अपेक्षित आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी सह वसई विरार व मीरा भाईंदर ह्या दोन्ही महापालिकांच्या निवडणूका येणाऱ्या नव्या वर्षात होणार असल्याने राजकारणातील गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचण्याचे प्रभावी काम पांडे यांना करावे लागणार आहे.