मधुमिता नारायणने पटकावले सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:38 AM2019-09-02T00:38:37+5:302019-09-02T00:38:45+5:30
ठाणे महापौर चषक राज्य सबज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धा : पालकमंत्र्यांकडून सन्मान
ठाणे : ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा व शहर बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २५ आॅगस्ट या कालावधीत आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ठामपाच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अॅकॅडमीच्या तेरावर्षीय मधुमिता नारायण हिने अजिंक्यपद पटकावले. आपल्या घरच्या मैदानावर कारकिर्दीतले पहिले सुवर्णपदक पटकावणाऱ्या मधुमिताला राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म,) सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले.
मधुमिताने उपांत्यपूर्व फेरीत नागपूरच्या आसावरी खांडेकरचा २१-६ , २१-९ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत अनन्या गाडगीळचे कठीण आव्हान मधुमिताने आपल्या आक्र मक फटक्यांनी व नेटजवळच्या सुंदर खेळाने २१-१५, २१-१९ अशी मात करत सहज विजय मिळवला. दुहेरीची पार्टनर व प्रतिस्पर्धी अलिशा नाईकबरोबर मधुमिताने अंतिम सामना खेळला. प्रथम गेमच्या सुरुवातीपासून काहीशी अडखळत खेळत मधुमिताने पहिला गेम १३-२१ असा खेळला. परंतु, दुसºया गेममध्ये मोठ्या रॅली खेळवत गेमवर २१-१२ अशी पकड मिळवली. निर्णायक ठरलेल्या तिसºया गेममध्ये सुरुवातीपासूनच प्रभुत्व मिळवत २१-७ असा सुवर्णविजय मधुमिताने सहज मिळवला.
दुहेरीत निकिता जोसेफ-आसावरी खांडेकर या नागपूरच्या जोडीविरु द्ध मात्र मधुमिता- अलिशा नाईक यांना २१-१३, २०-२२, १३-२१ या डावाने खेळून रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचे यशस्वी संयोजन केल्याबद्दल व दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य अजिंक्यपदाची परंपरा अकादमीने कायम राखल्याबद्दल ठाणे अॅकॅडमीचे प्रमुख श्रीकांत वाड, वरिष्ठ प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर यांनी समाधान व्यक्त केले. तर, पालकमंत्र्यांनी पारितोषिक वितरण समारंभास मधुमिताच्या या यशाबद्दल रोख २५ हजार रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले आहे. याप्रसंगी नगरसेविका पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, क्र ीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते.