घोडबंदर भागात भरणी माफियांचा कांदळवन क्षेत्रात धुमाकूळ; शहर बुडणार नाहीतर काय होणार?
By धीरज परब | Published: July 8, 2023 04:46 PM2023-07-08T16:46:00+5:302023-07-08T16:47:56+5:30
महापालिका, महसूल व पोलीस सह प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कारणीभूत असून यामुळे शहर आणखी बुडत चालल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
मीरारोड - मीरारोडच्या घोडबंदर भागात भरणी माफियांनी जमीन मालकांच्या संगनमताने धुमाकूळ घालत प्रचंड प्रमाणात डेब्रिस, माती भराव कांदळवन, पाणथळ व सीआरझेड क्षेत्रात चालवल्याचे उघडकीस आले आहे. महापालिका, महसूल व पोलीस सह प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कारणीभूत असून यामुळे शहर आणखी बुडत चालल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
कांदळवन, पाणथळ, सीआरझेड, इकोसेन्सेटीव्ही झोन मध्ये बेकायदेशीर रित्या डेब्रिस व माती - दगड भराव प्रशासन आणि राजकारणी यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे होत असल्याने पावसाळ्यात शहर पाण्यात बुडू लागल्याचे मुख्य कारण लोकं अनुभवत आहेत. परंतु भरणी रोखण्यासाठी प्रशासन गंभीर नसून एकमेकां कडे बोटं दाखवून स्वतःची जबाबदारी सोयीस्कर रित्या टाळली जात असल्याचे चित्र आहे.
आलेल्या तक्रारी नुसार घोडबंदर गावाच्या लगत शुक्रवारी महसूल, महापालिका , कांदळवन विभाग यांची संयुक्त स्थळपाहणी होती. त्यावेळी कांदळवन, पाणथळ व सीआरझेड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पणे डेब्रिज, दगड मातीचे नव्याने भराव केले जात असल्याचे दिसून आले. कांदळवन मध्ये नाल्यातून वाहून आलेला प्लास्टिक, थर्माकोल आदींचा कचरा दिसून आला. कांदळवन ची अनेक झाडे सुकून मरण पावलेली दिसली.
आरएमसी प्लांट मधील घातक काँक्रीट वेस्ट देखील कांदळवन मध्ये आणून टाकले जात असताना डंपर पकडण्यात आला. कांदळवन च्या मधोमध कांदळवन नष्ट करून बेकायदेशीर भराव करत मोठा रस्ताच बनवण्यात आल्याचे आढळले. याठिकाणी बेकायदेशीर चाळी बांधण्यात आल्या असून सांडपाणी कांदळवन मध्ये सोडले जात आहे.
या प्रकरणी काँक्रीट वेस्ट टाकणारा डंपर महसूल विभागाने काशीमीरा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. अपर तहसीलदार निलेश गौंड यांच्या निर्देशा प्रमाणे कांदळवन नष्ट करणारे जमीन मालक, जप्त डंपर चा चालक मालक, भरणी करणारे ठेकेदार तसेच भरणी आणि सपाटीकरण साठी वापरलेल्या वाहनांचे चालक मालक आदींवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे तलाठी अभिजित बोडके यांनी सांगितले.