७५०० मीटर कापडाचे भव्य प्रेममंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 03:32 AM2018-09-13T03:32:23+5:302018-09-13T03:32:57+5:30
७५०० मीटर कापडाचा वापर करून धामणकरनाका मित्र मंडळाने मथुरा वृंदावन येथील १२५ फूट उंचीच्या प्रेममंदिराचा हुबेहूब पर्यावरणपूरक देखावा उभारला आहे.
भिवंडी : कापडनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवंडीत उत्पादित केलेल्या ७५०० मीटर कापडाचा वापर करून धामणकरनाका मित्र मंडळाने मथुरा वृंदावन येथील १२५ फूट उंचीच्या प्रेममंदिराचा हुबेहूब पर्यावरणपूरक देखावा उभारला आहे. पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सवाचा देखावा यावर्षीदेखील गणेशभक्तांना आकर्षित करत आहे.
शहरातील धामणकरनाका मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा तिसावे वर्ष आहे. यावर्षीदेखील शहरात उत्पादित झालेल्या कापडाचा उपयोग करून पर्यावरणपूरक भव्यदिव्य देखावा या मंडळाने उभारला आहे. धामणकरनाका येथे मथुरा वृंदावन येथील प्रेममंदिर उभारण्यासाठी ओरिसा येथील सुमारे २५० कामगारांनी अहोरात्र मेहनत घेतली. या मंदिरासाठी १० हजार लाकडी बांबू, वासे आणि सुमारे ७५०० मीटर कपडा वापरण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली. या मंडळात सर्व जातीधर्मांचे तरुण सहभागी होऊन हा उत्सव शांततेत साजरा करत असतात. त्यानुसार, स्वाभिमान श्री गणेश दर्शन स्पर्धा, शहरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मृती चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांकरिता पथनाट्य स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, गरजू महिलांना शिवणयंत्रेवाटप, शहरातील शिस्तबद्ध गोविंदा पथकांचा बहुमान असे विविध उपक्रम मंडळाकडून राबवले जातात. गणेश दर्शनाचा प्रथम मान पडघा मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना दिला जातो. त्यांच्या हस्ते पूजन करून नंतर भक्तांना दर्शनाकरिता मंडपात प्रवेश दिला जातो.
>धामणकरनाका येथे गणेशभक्तांची अलोट गर्दी होत असते. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता संपूर्ण धामणकरनाका परिसरात २० सीसी कॅमेरे लावून त्यांचे नियंत्रण पोलीस विभागास देण्यात येते. याव्यतिरिक्त भक्तांच्या मदतीकरिता ३० सुरक्षारक्षक, मंडळाचे स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. हे वाहतुकीसह इतर परिस्थितीकडेही लक्ष ठेवतात.