पं. राम मराठे यांचे भव्यदिव्य स्मारक ठाण्यात उभे राहावे - विजय गोखले

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 23, 2023 05:36 PM2023-10-23T17:36:10+5:302023-10-23T17:36:59+5:30

चतुरस्त्र गायक आणि ठाण्याचे भूषण पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले.

magnificent monument of Ram Marathe should stand in Thane: Vijay Gokhale | पं. राम मराठे यांचे भव्यदिव्य स्मारक ठाण्यात उभे राहावे - विजय गोखले

पं. राम मराठे यांचे भव्यदिव्य स्मारक ठाण्यात उभे राहावे - विजय गोखले

ठाणे : संगीतभूषण, संगीत विश्वाचे गानवैभव असलेले पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे ठाणे महापालिकेने योजले ही सर्व संगीत प्रेमींसाठी अतिशय आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. पं. राम मराठे यांच्या लौकिकाला साजेसे भव्यदिव्य स्मारक ठाण्यात उभे रहावे. अधिकारी मंडळींनी त्याबद्दल विचार करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी केले.

चतुरस्त्र गायक आणि ठाण्याचे भूषण पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले. पं. मराठे यांच्यासह काम केलेले ज्येष्ठ ऑर्गनवादक पं. विश्वनाथ कान्हेरे, ज्येष्ठ तबला वादक पं. ओंकार गुलवाडी आणि निर्माते, अभिनेते गोखले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात पं. राम मराठे यांचे चिरंजीव संजय मराठे, मुकुंद मराठे, मुलगी सुशीला ओक, जावई रघुवीर ओक आणि कुटुंबीय, तसेच, ज्येष्ठ कलाकार मारुती पाटील, पं. मुकुंदराज देव, पं. विवेक सोनार, गायिका हेमा उपासनी, रवी नवले, पं. राम मराठे यांचे तैलचित्र साकारणारे चित्रकार किशोर नादावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पं. राम मराठे यांच्या गाण्यांची मोहिनी आजही कायम आहे, असे प्रतिपादन माळवी यांनी केले.

पितृतुल्य गुरूजी पं. राम मराठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले, त्यांच्यासह काम करण्याचा मान मिळाला. त्यांनी मला घडवले. मोठा कलाकार, चतुरस्त्र गायक ठाण्यात निवासाला होता हे ठाणेकरांचेही भाग्य आहे, अशा भावना पं. कान्हेरे यांनी व्यक्त केल्या. प्रयोग संपल्यावर जेवायला बसलो की ते दहीभात स्वत: कालवून खाऊ घालायचे. माझ्यावर त्यांनी पृतवत प्रेम केले, असेही त्यांनी सांगितले. माळवी यांच्या हस्ते पं. कान्हेरे, पं. गुलवाडी, गोखले, संजय मराठे, मुकुंद मराठे, ओक आणि चित्रकार नादावडेकर यांचा सत्कार करण्यात आला. मुकुंद मराठे यांनी याप्रसंगी नाट्यगीताची झलक सादर करीत या छोटेखानी सोहळ्याची सांगता केली.

Web Title: magnificent monument of Ram Marathe should stand in Thane: Vijay Gokhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे