कळव्यातही महाआरतीचे आयोजन आव्हाडांनी गायले रामाचे गोडवे
By अजित मांडके | Published: January 20, 2024 04:15 PM2024-01-20T16:15:13+5:302024-01-20T16:16:39+5:30
आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या सोशल मिडीया अंकाऊटला राम नामाचा नारा दिला आहे. शिवाय २२ जानेवारी कळव्यातही विराट कलश पुजन आमि राम दरबार पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
ठाणे : प्रभू श्रीराम हे मांसाहारी असे वादग्रस्त वक्तव्य करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड नाहक राग ओढवून घेतला असतांना त्यांच्या कळवा मुंब्रा मतदार संघात त्यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी राम नामाचा जयघोष सुरु केला आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या सोशल मिडीया अंकाऊटला राम नामाचा नारा दिला आहे. शिवाय २२ जानेवारी कळव्यातही विराट कलश पुजन आमि राम दरबार पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे आव्हाडांचे मत परिवर्तन झाले का? की त्यांचा विरोध मावळला अशी चर्चा सुरु झाली आहे.
येत्या २२ जानेवारी आयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिरात मूतीर्ची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. तदपूर्वी शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विशेष अधिवेशनात प्रवक्ते म्हणून बोलताना, आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी होते असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली एवढेच नाही तर त्यांच्यावर गुन्हा देखील झाला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत आगामी लोकसभेची तयार तसेच मतांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच २२ जानेवारी ला विविध कार्यक्रम होणार असून साहजिकच सर्वच नागरिक त्यामध्ये न सांगता सहभागी होणार आहे. त्यानुसार कळव्यातही शरद पवार गटातील राष्टÑवादीच्या माजी नगरसेवकांनी राम नामाचा जागर करीत आव्हाडांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यातही येथील घराघरात ८ हजाराहून अधिक झेंड्याचे वाटपही करण्यात आले. त्यानुसार कळवा देखील राममय करण्याचा प्रयत्न केला आहे.
परंतु आता आमदार आव्हाड यांनी देखील राम नामाचा जागर सुरु केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मिडियावर देखील रामाचे विविध स्वरुपाचे फोटे पोस्ट केले आहेत. तसेच त्यांचा महिमा देखील वर्णन केला आहे. याशिवाय राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी कळवा भागात आव्हाड यांच्या वतीने आनंद विहार खारेगाव फाटक कळवा पूर्व येथे काशीमधील पाच ब्राम्हणांच्या माध्यमातून विराट कलश पुजन व राम दरबार पुजन आणि महाआरती देखील घेतली जाणार आहे. त्याची तयारी आता सुरु झाली आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत असणार असल्याचेही नमुद करण्यात आले आहे. एकूणच आव्हाडांना देखील आता रामल्ललाची भुरळ पडली का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.