ठाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा धडाका

By अजित मांडके | Published: May 15, 2024 03:47 PM2024-05-15T15:47:20+5:302024-05-15T15:48:18+5:30

ठाणे लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे हे मागील काही दिवसापासून ठाण्यात तळ ठोकून आहेत.

Maha Vikas Aghadi and Maha Yuti campaigns in Thane lok sabha election 2024 | ठाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा धडाका

ठाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा धडाका

ठाणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला असून त्यानुसार पुढील तीन दिवस ठाणेलोकसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली ठाण्यात होणार आहे. त्यातही महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा शुक्रवारी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ठाण्यात प्रथमच या दोनही नेत्यांच्या सभा होणार आहेत. तर महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारी रोड शो घेण्यात येणार असून त्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे.  
 

ठाणे लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे हे मागील काही दिवसापासून ठाण्यात तळ ठोकून आहेत. त्यात आता गुरुवारी ठाण्यात सांयकाळी गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या रस्त्यावर महाविकास आघाडीची सभा घेण्यात येणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे आदींची देखील हजेरी लागणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच ठाण्यात सभा घेणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 

दुसरीकडे गुरुवारी दुपारी २ वाजता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक विनोद तावडे घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी तावडे हे ठाण्यात येत असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. दुसरीकडे शनिवारी सांयकाळी पाच वाजेपर्यंतही ठाण्यात प्रचाराचा धुराळा उडणार असल्याचे चित्र आहे. यादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो किंवा सभा घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील दुपारी ३ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: Maha Vikas Aghadi and Maha Yuti campaigns in Thane lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.