आघाडीचे ठरता ठरेना, त्याच त्याच उमेदवारांवाचून पान हलेना! तिन्ही पक्षांचा भिवंडीवर दावा
By नितीन पंडित | Published: June 10, 2023 06:20 AM2023-06-10T06:20:16+5:302023-06-10T06:20:50+5:30
युतीतील दोन्ही पक्षांचे बाळ्या मामांच्या भूमिकेकडे लक्ष
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : भिवंडीलोकसभा मतदारसंघावर सध्या भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. सलग दोन वेळा कपिल पाटील यांना मिळालेली खासदारकी आणि आता त्यांच्यामुळे ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात मिळालेले स्थान यामुळे त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीला तेवढ्याच क्षमतेचा उमेदवार द्यावा लागणार आहे. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेत येथील उमेदवारीवरून चुरस असली, तरी दोन्ही पक्षांकडून त्याच त्याच नावांचा उल्लेख होत असल्याने आणि त्याबाबत आघाडीचे काहीही धोरण ठरत नसल्याने गोंधळाची स्थिती आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आणि आता ओबीसींचे नेतृत्व करणाऱ्या पाटील यांनी भिवंडी, भोवतालचा ग्रामीण भाग, त्याचबरोबर शहापूर, मुरबाडमधील राजकारणावर चांगलीच पकड घेतली आहे. रेल्वेचे प्रश्न मांडून दळणवळणावर लक्ष केंद्रित केले.
त्याचवेळी पुण्यात नुकताच झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसपेक्षा अधिक असल्याचा दावा करत त्यावर दावा केला. मात्र उमेदवार कोण हे एकाही नेत्याला सांगता आलेले नाही. भिवंडीवर दीर्घकाळ दावा सांगणाऱ्या काँग्रेसकडेही माजी खासदार सुरेश टावरे, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे व तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांच्याशिवाय इतर उमेदवार नाहीत. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्याशिवाय सध्या दुसरा चेहरा नाही.
भिवंडी लोकसभेत भाजपला विशेषतः कपिल पाटील यांना लोकसभा निवडणुकीत टक्कर देणारा चेहरा म्हणून यापूर्वी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्याकडे पाहिले जात होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्याशी तसा संपर्कही साधला होता. मात्र नंतर ते राष्ट्रवादीतून शिवसेनेच्या शिंदे गटासोबत गेले. त्यामुळे पाटील यांच्यापुढील थेट आव्हान टळले. सध्या बाळ्या मामा यांनी थेट कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही. मात्र त्यांनी तशी काही भूमिका घेतली, तर त्यातून राजकीय अडचण होऊ नये यासाठी युतीतील शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांचे त्यांच्याकडे लक्ष आहे.
या लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन भाजपकडे, दोन शिवसेनेकडे, एक समाजवादी पक्षाकडे, तर एक राष्ट्रवादीकडे आहे. मात्र मुरबाडमधील भाजप आमदार किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यातील राजकीय वाद कळीचा ठरतो आहे.
समाजवादी, बविआची भूमिका महत्त्वाची
- काँग्रेसची भिस्त समाजवादी पक्षाच्या मदतीवर आहे, तर समाजवादी पक्षाला स्वतःलाच या मतदारसंघात ताकद अजमावयाची आहे.
- वसई-विरारचे राजकारण करता करता हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने गेल्या वेळी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या उमेदवाराला ५१ हजार मते मिळाली असली, तरी मतविभागणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
- कायमच सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणाऱ्या बविआची यावेळची राजकीय भूमिकाही या घडामोडींत कळीची ठरेल.
मतांचे गणित कसे ?
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील यांनी चार लाख ११ हजार ७० मते मिळवली. त्यांचे त्या वेळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना तीन लाख १ हजार ६२० मते मिळाली होती. २०१९च्या निवडणुकीत पाटील यांच्या मतांत वाढ होऊन ती पाच लाख २३ हजार ५८३ वर पोहोचली, तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना तीन लाख ६७ हजार २५४ मते मिळाली होती. भाजपची मते चार टक्क्यांनी तर काँग्रेसची मते दोन टक्क्यांनी वाढली होती.