नंदकेश्वरला शिवकालीन महादेव मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:39 AM2020-02-21T01:39:35+5:302020-02-21T01:40:00+5:30
दुर्गप्रेमी काचरे यांचा दावा : आजही आढळतात अवशेष
पंडित मसणे
वासिंद : शहापूर तालुक्यातील वासिंदपासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वांद्रे येथील नंदकेश्वर या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्ताने जत्रा भरते. वासिंद-कांबारा या रस्त्यावर पिवळीजवळ वांद्रे हे आदिवासी व जंगल परिसराचे गाव आहे. माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लहान भवारी नावाच्या टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महादेवाचे मंदिर बांधण्यात आले होते. पुढे मुघलांनी हे मंदिर उद्ध्वस्त केले. त्याचे अवशेष आजही येथे आढळतात, असा दावा दुर्गप्रेमी महेश काचरे यांनी केला आहे.
१९७५ मध्ये टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पिवळी-वांद्रे येथील ग्रामस्थांना मंदिराच्या ठिकाणी मातीत गाडलेले एक शिवलिंग सापडले. याच शिवलिंगाची पूजा करून परिसरातील ग्रामस्थांनी छोटेसे कौलारू मंदिर बांधले. या ठिकाणी एक पाण्याचा झरा बाराही महिने वाहतो. हा झरा नंदीचे पाणी (नांदीचे पाणी) म्हणून प्रसिद्ध आहे. यावरूनच मंदिराला नंदकेश्वर असे नाव पडले. या झऱ्याच्या ठिकाणी पुरातत्त्व विभागाने कुंड्यांना संरक्षक बांधकाम केले. या परिसरात कोरीव काम केलेले दगड पाहायला मिळतात. बरेच दगड मंदिराजवळ एकत्रित ठेवल्याचे काचरे यांनी सांगितले. या परिसरात जाण्यासाठी रस्ताही तयार केला आहे. परंतु, येथे तीव्र उतार असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. ठाणे, पालघर येथून भाविक मोठ्या संख्येने येतात. वर्षभर धार्मिक कार्यक्र म सुरू असतात. दरम्यान, भक्तांसाठी विविध समस्या भेडसावतात. विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.