महाडच्या स्वच्छता अभियानास अखेर सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:36 AM2021-08-01T04:36:38+5:302021-08-01T04:36:38+5:30
ठाणे : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे पुराचा तडाखा बसलेल्या महाड शहराच्या स्वच्छतेसाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर उतरले ...
ठाणे : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे पुराचा तडाखा बसलेल्या महाड शहराच्या स्वच्छतेसाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर उतरले असून, ठाण्यासह विविध महापालिकांचे कर्मचारी व आवश्यक साधनसामग्रीच्या मदतीने महाडच्या स्वच्छतेला शनिवारी सुरुवात झाली. त्याचबरोबर, शहराला स्वच्छतेसाठी वाढीव दीड कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. त्यांनी यापूर्वीच ५० लाखांची मदत जाहीर केली होती. मात्र, झालेले नुकसान पाहता ही रक्कम पुरेशी नसल्याचे निदर्शनास आल्याने वाढीव दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
कोकणात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका महाड, चिपळूण, खेड या शहरांना बसला. महाड शहरात आणि बाजारपेठेत १३ फुटांपर्यंत पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब होती ती शहर स्वच्छ करण्याची. महाड नगरपालिकेची क्षमता मर्यादित असल्याने या कामासाठी स्वतः नगरविकास मंत्र्यांनी पुढाकार घेतला. ठाणे महापालिकेचे १५० सफाई कर्मचारी, नवी मुंबई महापालिकेचे १२० सफाई कर्मचारी, पनवेल महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी, टीडीआरएफ पथकाचे ३० जवान असे मनुष्यबळ या स्वच्छता कामासाठी तैनात करण्यात आले. याशिवाय ठाणे महापालिकेने पाठविलेले ड्रेनेज लाइन स्वच्छ करणारे टँकर्स, २० जेसीबी, २० डंपर, पाच घंटागाड्या, ठाणे महापालिकेच्या काही जेटिंग मशिन्स, ठाणे मनपाचे तीन फायर टँकर्स, महाड नगरपालिकेचे तीन फायर टँकर्स, तसेच ठाणे व खोपोलीवरून घरे स्वच्छ करण्यासाठी आणण्यात आलेले स्प्रेइंग मशिन्स, रोगराई पसरू नये यासाठी धूर फवारणी करणाऱ्या फॉगिंग मशिन्स अशा सामग्रीचा समावेश आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता शिंदे यांनी जिल्हा मदत केंद्रात परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येकाला जबाबदारी नेमून दिली. महाड शहरात पूर ओसरल्यानंतर लेप्टोस्पायरोसिसचे १५ रुग्ण आढळले आहेत. ही साथ वाढू नये, तसेच इतर रोगही शहरात पसरू नयेत यासाठी आपण स्वतः या स्वच्छता कामासाठी पुढाकार घेतला असून, सर्व यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील दोन दिवसांत संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
........