ठाण्याजवळ महाहब, स्टार्टअपसाठी एकाच छताखाली मिळणार विविध सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 05:29 AM2023-10-06T05:29:13+5:302023-10-06T05:29:25+5:30
स्टार्टअपच्या उभारणीपासून विपणनापर्यंत विविध सुविधा पुरविणारे महत्त्वाकांक्षी महा-हब-इनक्युबेटर आणि स्टार्ट अप इनोव्हेशन सेंटर लवकरच ठाणे शहराजवळ उभारण्यात येणार आहे.
मुंबई : स्टार्टअपच्या उभारणीपासून विपणनापर्यंत विविध सुविधा पुरविणारे महत्त्वाकांक्षी महा-हब-इनक्युबेटर आणि स्टार्ट अप इनोव्हेशन सेंटर लवकरच ठाणे शहराजवळ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील या सेंटरसाठी एक कंपनी स्थापन केली जाणार आहे. त्यात नऊ संचालक असतील. उद्योग/उपक्रम भांडवलदार/खासगी इक्विटी फंड या क्षेत्रातील कंपन्यांचे चार संचालक असतील व त्यांचे कंपनीतील योगदान प्रत्येकी दहा कोटी रुपयांचे असेल.
आयआयटी मुंबई, आयआयएम मुंबई आणि नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी मुंबई या तीन नामवंत शैक्षणिक संस्थांमधील अधिष्ठाता दर्जाचे अधिकारी असतील.
ठाण्याजवळील अंतरली येथे २५ हेक्टर सरकारी जागेवर हे सेंटर उभारले जाईल. पहिल्या टप्प्यात सहा लाख चौरस फुटांचे बांधकाम केले जाईल. या उपक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी मु्ख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री कौशल्य विकास मंत्री यांची उच्चस्तरीय समिती असेल. माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य सचिव असतील. त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीवर असेल.
मार्गदर्शनासाठी...
सेंटरमध्ये विविध वित्तीय संस्थांची कार्यालये असतील. स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.
कच्चा माल, विविध उपकरणे मिळविण्यासाठीचे मार्गदर्शन केले जाईल आणि स्टार्ट अप आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य कसा होईल, यासाठीही मार्गदर्शन केले जाईल.
याशिवाय स्टार्टअपमध्ये
तयार झालेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या सेंटरची उभारणी लवकरात लवकर सुरू केली जाईल. राज्यभरातील स्टार्ट अपसाठी एक प्रभावी फोरम म्हणून हे सेंटर काम करेल.
- पराग जैन, प्रधान सचिव, माहिती-तंत्रज्ञान विभाग