धनगर समाजाचा १० नोव्हेंबरला नवी मुंबईत महामोर्चा
By अजित मांडके | Published: November 8, 2023 03:49 PM2023-11-08T15:49:56+5:302023-11-08T15:50:30+5:30
समिती नको ,आता आरक्षण द्या, धनगर समाजाची मागणी.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सरकारने ५० दिवसाचे आश्वासन देऊनही धनगर आरक्षण अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांच्या वतीने सकल धनगर समाज, महाराष्ट्र माध्यमातून नवी मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर विविध आंदोलने, निदर्शने झाली. चौंडीमध्ये तर २१ दिवसांचे उपोषण झाले. त्यावेळी धनगर समाजाला ५० दिवसाचा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. आता सरकार धनगर आरक्षणासाठी समिती नेमण्याच्या तयारीत आहे. याला धनगर समाजाने विरोध दर्शवला असून समिती म्हणजे वेळकाडूपणा आहे त्यामुळे आता समिती नको, धनगर आरक्षण अंमलबजावणी करा या मागणीसाठी सकल धनगर समाज,महाराष्ट्र यांच्या वतीने नवी मुबई,सीबीडी बेलापूर येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यलयावर १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता महामोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती बुधवारी ठाण्यातील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली .यावेळी समन्वय समितीचे महादेव अर्जुन,भास्कर यमगर,मल्लिकार्जुन पुजारी,सखाराम गारले,रावसाहेब बुधे,नारायण खरजे,दीपक कुरकुंडे,तुषार धायगुडे,उद्धव गावडे आदींसह उपस्थित होते.
या मोर्चामध्ये २५ हजार समाजबांधव सहभागी होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाने देखील मोर्चाला पाठिंबा दिला.
समिती नको आता आरक्षण अमलबजावणी करा
राजकिय पक्षांनी धनगर समाजाची केवळ धुळफेक केली. नेत्यांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. न्यायालयाला पटवुन द्यायला हवे. राजकिय पक्षांनी आमचा नुसताच खेळ मांडु नये.ज्याप्रमाणे सरकार मराठा आरक्षणासाठी झटपट पावले उचलत आहेत त्याप्रमाणे धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी सरकारने तत्परता दाखवावी.समिती नेमून वेळकाडूपणा करू नये असे समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.