महामुंबई महामॅरेथॉन...पूर्वसंध्येलाच बीब एक्स्पोपासूनच ‘कर दे धमाल’ सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 08:04 AM2023-12-03T08:04:05+5:302023-12-03T08:04:49+5:30
लोकमत महामुंबई महामॅरेथॉन रविवारी असून, त्या पार्श्वभूमीवर शनिवारी रेमंड ट्रेड एक्स्पो हॉल येथे बीब एक्स्पोचे आयोजन केले होते.
ठाणे : लोकमत महामुंबई महामॅरेथॉनच्या बीब एक्स्पोमध्ये रॉक बँडवर एकेका लोकप्रिय गाण्याची धून वाजू लागताच बीब्स घेण्याकरिता आलेल्या तरुणाईची पावले थिरकू लागली. अवघ्या काही क्षणात रेमंडच्या त्या सभागृहात शेकडो तरुण-तरुणींनी ठेका धरला व नृत्याच्या जोशपूर्ण उत्साहाने साऱ्या सभागृहात सळसळते वादळ निर्माण झाले. महामुंबई महामॅरेथॉनच्या पूर्वसंध्येलाच बीब एक्स्पोपासूनच ‘कर दे धमाल’ सुरू झाली.
रोहन रावत आणि ग्रुपने सादर केलेल्या रॉक बँडने बीब एक्स्पोची रंगत उत्तरोत्तर वाढवली. लोकमत महामुंबई महामॅरेथॉन रविवारी असून, त्या पार्श्वभूमीवर शनिवारी रेमंड ट्रेड एक्स्पो हॉल येथे बीब एक्स्पोचे आयोजन केले होते. यावेळी धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी रॉक बँडने सादरीकरण केले. या रॉक बँडला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. इतकेच नव्हे तर सखी मंचच्या महिलाही फेर धरून नाचत होत्या. बाप-लेक, मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहीण असे सारेच थिरकत होते.
‘छोगारा तारा’ या गाण्यावर सर्वच धावपटू गरबा खेळू लागले. त्यानंतर राबता, केसरीया, गल्यान साखली सोन्याची, यमला पगला दीवाना, ओम
शांती ओम, ये दोस्ती हम नही तोडेंगे, झिंग झिंग झिंगाट, मै निकला गड्डी लेके, तेरी आँखो का ये काजल, जवानी फिर ना आए यांसारख्या अनेक बॉलिवूड, मराठी गाण्यांवर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती.
गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी लोकमत महामुंबई महामॅरेथाॅनचा उत्साह भरभरून आहे. प्रत्येक ठिकाणी मेडिकल, हायड्रेशन, रिफ्रेशमेंट अशा विविध सुविधांचे आयोजन नेटाने केले आहे. गेल्यावर्षीचा रिपोर्ट चांगला होता म्हणून यंदा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. - हरिदास नायर, मेंटॉर
‘लोकमत’ने बीब एक्स्पोचे अप्रतिम आयोजन केले आहे. गर्दीवर नियंत्रण देखील उत्तमरीत्या केले आहे. येथे आल्यावर एक प्रकारचा जिवंतपणा जाणवत आहे. प्रायोजकांनी चांगले सहकार्य केले आहे. - गिरीश बिंद्रा, मेंटॉर
मान्यवरांची उपस्थिती
भाजप आमदार ॲड. निरंजन डावखरे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलिस अतिरिक्त आयुक्त संजय जाधव आणि महेश पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, क्रेडाई एमसीएचआय, ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, नीरा अस्थाना, महानगर गॅस लि.चे कॉर्पोरेट कम्युनिकेशन जनरल मॅनेजर, टीप टॉप प्लाझाचे संचालक जयदीप शाह, युनियन बँकेचे ठाणे डेप्युटी रिजनल हेड राजकुमार सोनम, ब्लॉसम रेडी टू ईटचे व्यवस्थापकीय संचालक आनंद ठक्कर, कॅन्सर कंट्रोल मिशनचे संस्थापक पुष्पेंद्र राज, रौनक ॲडव्हर्टायझिंगचे प्रोप्रायटर अमरदीप सिंह, लायन ताराचंद बाप्पा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुहास देसाई, टोटल स्पोर्ट्सचे मार्केटिंग हेड रवींद्र साळुंखे, फार्च्युन राईस ब्रॅन हेल्थ ऑईलचे झोनल ट्रेड मार्केटिंग मॅनेजर श्रीकांत पाटणकर, कीक इव्हीचे संस्थापक सागर जोशी.