महानंदा : होरपळलेल्या दोन जीवांची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 12:06 AM2019-11-03T00:06:09+5:302019-11-03T00:06:34+5:30

...आणि ग्रंथोपजीविये - रामदास खरे

Mahananda: The story of two living beings, jaywant dalvi | महानंदा : होरपळलेल्या दोन जीवांची कहाणी

महानंदा : होरपळलेल्या दोन जीवांची कहाणी

googlenewsNext



मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
जन्मजन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी
विरागी, की म्हणू भोगी?
शैलसुतासंगे गंगा मस्तकी वाहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे!

हे गाणं आठवतं ना? सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या सुरेल आवाजातले हे गाजलेले गीत. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या महानंदा या चित्रपटातील गीत. शब्द अर्थातच कवयित्री, गीतकार शांताबाई शेळके यांचे आणि त्यांच्या शब्दांना स्वरसाज चढवला आहे तो प्रतिभाशाली संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपटाची सुरुवातच या गीताने होते आणि आपण अलगद, तरंगत गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात कधी जाऊन पोहोचतो, ते समजतच नाही. हा चित्रपट पाहून मी वेडावून गेलो होतो.
नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मी नोकरीच्या शोधात होतो. हा चित्रपट पाहण्यापूर्वी आमच्या कॉलेजच्या लायब्ररीत ती कादंबरी मी झपाटल्यासारखी वाचली होती. सिद्धहस्त लेखक, नाटककार, जयवंत दळवी (१९२५ ते १९९४) यांच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर साहित्यकृती. महानंदा... होय महानंदा. ही कादंबरी वाचल्यामुळे चित्रपटाचा आनंद घेऊ शकलो. तरीही, ज्या मूळ कादंबरीवरून हा चित्रपट साकारला होता, ती महानंदा कादंबरी चित्रपटापेक्षा मला जास्त भावली. कारण, जयवंत दळवी यांच्या लेखनशैलीतून त्याकाळचे वातावरण, तो निसर्ग, त्या व्यक्तिरेखा, ती असोशी, नातेसंबंधांची फरफट इतकी सुरेख आणि नेमकी रेखाटली आहे की, कादंबरी वाचताना आपल्या नजरेसमोरच ते नाट्य घडते आहे, त्या व्यक्तिरेखा आपणाशी संवाद करत आहेत, अशी विलक्षण अनुभूती मला मिळाली होती. दळवींनी उभ्या केलेल्या अद्भुत विश्वातून बाहेर पडण्यास मला खूप वेळ लागला, हे नक्की.
जयवंत दळवी यांची महानंदा ही लघुकादंबरी मार्च १९७० मध्ये मॅजेस्टिक प्रकाशनने प्रकाशित केली. त्यास वाचकरसिकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभल्याने गेल्या काही वर्षांत या कादंबरीच्या चक्क दहाच्यावर आवृत्त्या प्रकाशित झाल्या. एका सकस, अभिजात कादंबरीच्या नशिबी किती छान योग येतो, ते पाहा. १९८४ मध्ये याच कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट, तर १९८७ मध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांना उत्तम प्रतिसाद लाभला. साहित्यिक, नाटककार शं.ना. नवरे यांनी तर या कादंबरीच्या प्रेमात पडून त्याचे नाट्यरूपांतर केले. त्यांनी केलेल्या नाटकाचे नाव होते ‘गुंतता हृदय हे’. हे नाटक कादंबरीनंतर लगेच चार वर्षांनी म्हणजे १९७४ मध्ये प्रथम रंगमंचावर आले. त्यालाही रसिकांची पसंती मिळाली. प्रारंभीच्या काही प्रयोगांत डॉ. काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांनी साकारलेली भूमिका अनेकांच्या स्मरणात असेल. सन २०१८ पर्यंत वेगवेगळ्या कलावंतांच्या संचांत त्याचे प्रयोग होत होते.
लेखक, नाटककार जयवंत दळवी यांच्या लेखनाचा प्रवास प्रथम कथा, कादंबरी, नाटक आणि नंतर चित्रपट असा झाला आहे. इतर लेखकांच्या नशिबी हा योग दुर्मीळच. त्यामानाने जयवंत दळवी खरोखरच भाग्यवान म्हटले पाहिजे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कधीना कधी दळवींची ही अजरामर कलाकृती वाचण्याचा किंवा पाहण्याचा योग नक्कीच आला असेल. तरीही, याची कहाणी अगदी थोडक्यात सांगतो. प्रथम दळवींच्याच लेखणीतून उतरलेल्या कादंबरीतील एका भागाची झलक देतो म्हणजे आपणास अंदाज येईल.
‘खरं म्हणजे मामांना ओढ लावणारी कल्याणी वाईट की, मामांना ओढ न लावू शकणारी मामी वाईट? सर्वांच्या दृष्टीनं कल्याणी वाईट! आणि मामी बरी! कारण, कल्याणी भावीण! आणि मामी मामांची लग्नाची बायको! वास्तविक, स्वच्छ मनानं विचार केला तर कल्याणीबद्दल सर्वांना सहानुभूती वाटायला हवी. आपल्या समाजानं आपल्या सुखासाठी देवाचं निमित्त करून निर्माण केलेली भाविणीची संस्था! त्यात बळी कल्याणीच, तिनं केवळ तिची आई भावीण म्हणून देवाला वाहून घ्यायचं. स्वत: लग्न करायचं नाही. जो खोत पैसा देईल, सांभाळ करील, त्याच्या मनासारखं आणि लहरीसारखं वागायचं.’
बाबुल हा मुंबईमधील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करतोय. बऱ्याच वर्षांनी अगदी सहजपणे गोव्याच्या निसर्गरम्य ठिकाणी राहणाºया मामा-मामींकडे सुटीमध्ये राहावयास येतो. गावातल्याच रवळनाथाच्या देवळात बाबुलची सहजपणे गाठ पडते कल्याणीशी. कल्याणी बाबुलला ओळखते. देवाची सेवा करणारी भावीण कल्याणीला सारा गाव ठाऊक आणि सारा गावदेखील या भाविणीला पुरता ओळखून असतो. हळूहळू बाबुलला सारे कळू लागते. आपल्या मामांचे आणि भाविणीचे संबंध काय आहेत, हेही कळून चुकते. मामीला हे सारे माहीत असते, ती आतल्याआत फक्त जळत असते, रोज विझत असते. अशाचवेळी बाबुलची गाठ पडते कल्याणीच्या मुलीशी म्हणजेच मानूशी. मानू म्हणजेच महानंदा. मानूच्या सौंदर्यामुळे बाबुल पुरता घायाळ होतो. लग्न करीन तर फक्त महानंदाशीच असा निर्धार करीत असतानाच कल्याणीला हे लग्नबिग्न अजिबात मान्य नसते. कारण, भाविणीने फक्त देवाचीच सेवा करायची असते. लग्न वगैरे केल्यास देवाचा कोप होईल, मोठे अरिष्ट येईल, असे तिला वाटत असते. त्यामुळे तिची परवानगी मिळणार नसल्याने पळून जाऊन लग्न केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय बाबुलपाशी उरत नाही. मानूला विश्वासात घेऊन तसे तिला वचन देऊन बाबुल मुंबईला परततो.
मुंबईहून बाबुल मानूला पत्रं पाठवतो की, अमुकतमुक दिवशी मी तुला नेण्यास येईल तेव्हा तू तयार राहा. मात्र, ही सारी पत्रे गावातला लंपट पोस्टमास्तर मध्येच लंपास करून कल्याणीला दाखवतो. ती ताबडतोब मानूला परगावी पाठवून देते. इकडे बाबुल गावी मानूच्या घरी येतो. कल्याणी त्याला भलतेच काही सांगते. तिला पाचवा महिना लागला आहे, आम्ही भाविणी, जो आसरा देतो त्यालाच आम्ही सेवा देतो. तेव्हा तू तिला विसर. मला भेटू नकोस, असे तिने स्पष्ट मला सांगितले आहे, असे कल्याणीने सांगितल्यावर बाबुल पुरता कोसळतो.

मानूने आपल्याला फसवले, असे वाटून त्याचा जगण्यातला सारा रसच संपतो. मुंबईत लग्नासाठी आई बाबुलपाशी हट्ट करते, मात्र बाबुल लग्न करत नाही. पश्चात्तापाच्या आगीमध्ये तो जळत असतो. बरीच वर्षे जातात. इकडे गावातले मामा वारतात. मामीला भेटायला बाबुल गावी जातो आणि... एका अवचित वळणावर त्याची गाठ पडते महानंदाशी. एव्हाना, कल्याणीला पुरते वेड लागलेले असते. थकलेली मानू सारे सत्य बाबुलला कथन करते. बाबुल नि:शब्द होतो. दोघांच्या जीवाची फसवणूक, फरफट करणाºया कल्याणीला चांगलीच शिक्षा मिळालेली असते. पुढे काय होते? मानूला झालेली मुलगी... ती कोणाची असते? महानंदा आणि बाबुलचे लग्न होते का? बाबुल कोणता निर्णय घेतो? याची सारी उत्तरे या कादंबरीच्या उत्तरार्धात मिळू शकतील.

रूढी, परंपरेच्या जोखडात कोमेजलेल्या आणि पुढे सामाजिक बंधनात जखडून गेलेल्या, होरपळलेल्या दोन प्रेमी जीवांची विलक्षण हुरहूर लावणारी आणि वाचकाला अंतर्मुख करणारी कहाणी म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी लिखित अजरामर साहित्यकृती महानंदा. १९७० मध्ये प्रकाशित या कादंबरीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गेल्या काही वर्षांत याच्या दहाहून अधिक आवृत्त्या निघाल्या. अगदी आताआतापर्यंत कर्नाटक, गोवा आणि दक्षिण कोकणात गावातल्या काही देवळांभोवती देवदासींची प्रथा अस्तित्वात होती. देवदासी म्हणजे विशिष्ट देवाला वाहिलेल्या मुली. देवाच्या सेवेच्या नावाखाली या मुलींचे लैंगिक शोषण होत असे. त्यामध्ये गावातली अनेक प्रतिष्ठित मंडळी गुंतलेली असत. देवदासींना लग्न करण्यास परवानगी नसे. पुढे देवदासींचे दोन गट पडले. कलावंतिणी वा नायकिणी आणि भाविणी. ही अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी अनेक राज्यांनी विविध कायदे केले. तरीही, देवदासी संस्था आज पूर्णपणे नामशेष झाली आहे, असे खात्रीने म्हणता येणार नाही. दळवी यांनी त्या काळातला हा ज्वलंत विषय निवडून त्याभोवती कथा गुंफून ‘महानंदा’ ही साहित्यकृती निर्माण केली, त्यास खरोखरच तोड नाही.
 

Web Title: Mahananda: The story of two living beings, jaywant dalvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे