Vidhan sabha 2019 : ठाणे शहर मतदारसंघात तिरंगी लढत; भाजपला मनसेसह राष्ट्रवादीचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 01:25 AM2019-10-03T01:25:35+5:302019-10-03T01:25:53+5:30
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.
ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून सुहास देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर, मनसेकडून अविनाश जाधव हे मैदानात उतरणार असल्याने येथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेना व भाजपचे वर्चस्व आहे. तो मिळावा, यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका-यांकडून हालचाली सुरू होत्या. मात्र, पक्षाने या मतदारसंघाची मागणीच केली नसल्याचे उघड झाले आहे. तर, स्थानिक पदाधिका-यांच्या विरोधानंतरही भाजप श्रेष्ठींनी आमदार संजय केळकर यांनाच उमेदवारी दिली आहे. या विधानसभा क्षेत्रात ब्राह्मण, गुजराथी आणि उच्चभ्रू मतदारांची संख्या जास्तीची आहे. त्यामुळे याचा फायदा हा मागील कित्येक वर्षे शिवसेना आणि भाजपच्याच उमेदवाराला झालेला दिसून आला आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा पराभव केला होता. केळकर यांना ७० हजार ८८४ मते मिळाली होती. तर, मनसेचे निलेश चव्हाण यांना अवघी आठ हजार ३३८ मते मिळाली होती. आता ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. परंतु, २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये मनसेच्या मतांमध्ये तब्बल २७ टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मनसेने आपला उमेदवार उभा केला नसल्याने मनसेला या मतदारसंघातून किती मते मिळणार, याचा अंदाज अद्यापही पक्षाला बांधता आलेला नाही. दरम्यान, राष्टÑवादीने सुहास देसाई यांना संधी दिली असून राबोडीतील मतांचा फायदा त्यांना होणार असला, तरी शहरातील इतर पट्ट्यातून मते मिळविण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे.