नरेंद्र मेहतांना उमेदवारी दिल्याने नाराज भाजपाच्या ३ माजी नगरसेवकांचे राजीनामे
By धीरज परब | Published: October 31, 2024 07:30 PM2024-10-31T19:30:30+5:302024-10-31T19:31:10+5:30
मेहतांच्या कार्यप्रणाली व वागण्याबद्दल जनतेमध्ये रोष आहे . ते दोन वेळा हरले होते. पक्षात अन्य कोणी चांगली व्यक्ती नाही का? असा सवाल नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने शेवटच्या क्षणी माजी आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली. मात्र पक्षाच्या या निर्णयाने नाराज झालेल्या भाजपाच्या तिघा माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या शिवाय भाजपातील मेहता विरोधक देखील नाराज आहेत.
मीरा भाईंदर मतदारसंघातून शेवटच्या क्षणी मेहतांना भाजपाची उमेदवारी दिली, विद्यमान आमदार गीता जैन यांनी २०१९ प्रमाणेच पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे . मीरा भाईंदर पुन्हा एकदा इतिहास घडवेल . बिल्डरपासून रिक्षावाला व गृहिणी पासून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणीना वाटते की, त्यांना सुरक्षित रहायचे असेल शहर सुरक्षित ठेवायचे असेल तर निर्णय पण त्यांनाच घ्यायचा आहे . जनतेवर माझा विश्वास असून जनता ही निवडणूक स्वतःची समजून लढेल . ज्या मेहतांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले. ज्यांचा भ्रष्टाचार व चारित्र्य जगजाहीर आहे. ज्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ आलेत अशा उमेदवाराला पार्टी अजूनही साथ देते तर त्या मागे अशी कोणती मजबुरी आहे? हे जनतेला देखील समजले पाहिजे असं गीता जैन यांनी म्हटलं.
मेहतांना उमेदवारी दिल्याच्या विरोधात भाजपाच्या माजी महिला मोर्चा प्रदेश सचिव, सोशल मीडिया संयोजिका तसेच माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे . मेहतांच्या कार्यप्रणाली व वागण्याबद्दल जनतेमध्ये रोष आहे . ते दोन वेळा हरले होते. पक्षात अन्य कोणी चांगली व्यक्ती नाही का? ऍड . रवी व्यास जिल्हाध्यक्ष झाले होते त्यावेळी त्यांच्या सभेवर मेहता यांनी बहिष्कार टाकला. जिल्हाध्यक्ष नियुक्ती वरून प्रदेश नेतृत्वाचा विरोध केला होता अशांना भाजपाने उमेदवारी दिली हे पक्ष विचारधारेवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांना पटलेले नाही असे डॉ . नयना यांनी सांगितले .
मीरारोड मधील भाजपाचे माजी नगरसेवक अश्विन कासोदरिया , माजी भाजपा नगरसेविका प्रतिभा पाटील आदींसह अन्य कार्यकर्त्यांनी देखील भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी देखील मेहतांना उमेदवारी दिल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे मेहतांना उमेदवारी दिल्याने भाजपाचे माजी सभापती सुरेश खंडेलवाल सह माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी आदींनी अपक्ष अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मेहता समर्थक एझाज खतीब देखील अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.