ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील

By संदीप प्रधान | Published: November 5, 2024 06:05 AM2024-11-05T06:05:19+5:302024-11-05T06:07:37+5:30

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेनेला महाराष्ट्रात सर्वप्रथम सत्ता दाखवणारा ठाणे जिल्हा विधानसभा निवडणुकीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभा राहणार की स्व. आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण करणार, याचे उत्तर निकालातून मिळणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Battle for supremacy in Thane; Out of 19 constituencies, insurgency eclipsed in six places, Shiv Sena Shinde, Shiv Sena UBT along with BJP is also trying to be the big brother in the district | ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील

ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील

- संदीप प्रधान
ठाणे - शिवसेनेला महाराष्ट्रात सर्वप्रथम सत्ता दाखवणारा ठाणे जिल्हा विधानसभा निवडणुकीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभा राहणार की स्व. आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण करणार, याचे उत्तर निकालातून मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्याने शिंदेसेनेला बळ दिले. मात्र, महायुतीमधील भाजपला भिवंडी लोकसभेतील पराभवाने झटका मिळाला. महायुती व महाविकास आघाडीला बंडखोरांनी काही प्रमाणात ग्रासले आहे. मात्र, ठाणेकर थेट कौल देतील, अशी अपेक्षा आहे.

विधानसभा निवडणुकीत शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशी लढत, चुरस आहे. त्याचबरोबर महायुतीमध्ये शिंदेसेना व भाजप यांच्यातही चुरस आहे. मुख्यमंत्रिपद पुन्हा मिळवण्याकरिता शिंदेसेनेला ठाण्यावर वर्चस्व प्राप्त करायचे आहे, तर भाजपही जिल्ह्यात मोठा भाऊ होण्याकरिता प्रयत्नशील आहे. भिवंडी लोकसभेतील विजयामुळे शरद पवार गटाच्या ठाणे जिल्ह्यात पाळेमुळे मजबूत करण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  काँग्रेसला यावेळी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागल्याने काँग्रेस निराश आहे. यातूनच महायुती व मविआत बंडखोरीचे पीक आले.

कोपरी-पाचपाखाडीत काँग्रेसचे बंड
ठाणे विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. भाजपचे संजय केळकर, उद्धवसेनेचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात लढत आहे. मागील वेळेस जाधव यांचा २० हजार मतांनी पराभव झाला होता. आता या मतदारसंघात उद्धवसेनेचा उमेदवार असल्याने ही अटीतटीची लढत होणार आहे. कोपरी पंचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लढत उद्धवसेनेचे केदार दिघे यांच्यासोबत होत आहे. उद्धवसेनेने याठिकाणी ‘दिघे कार्ड’ खेळले आहे. ते कितपत चालणार, याची उत्सुकता आहे. काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी बंडखोरी केल्याने उद्धवसेनेकरिता अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या लढतीत काँग्रेसने बिब्बा घातला. 

ओवळा माजीवडा या मतदारसंघात शिंदेसेनेचे प्रताप सरनाईक तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात उद्धवसेनेकडून त्यांचे पूर्वीचे निकटवर्ती नरेश मणेरा हे मैदानात उतरले आहेत. मनसेने या ठिकाणी पुन्हा एकदा संदीप पाचंगे यांना संधी दिली आहे. या तिरंगी लढतीत सरनाईक यांचे मताधिक्य वाढते का कमी होते, हेच पाहणे महत्त्वाचे आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघात गुरू-शिष्य लढत आहे. शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्यात थेट लढत आहे. मनसेने सुशांत सूर्यराव हा उमेदवार दिला आहे. सूर्यराव यांना किती मते मिळतात, यावर आव्हाड यांचे मताधिक्य ठरणार आहे.

गायकवाड विरुद्ध गायकवाड
डोंबिवलीत भाजप विरुद्ध उद्धवसेनेत थेट लढत बघायला मिळणार आहे. शिंदेसेनेतून ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी उद्धवसेनेत गेलेले दीपेश म्हात्रे यांचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना आव्हान असणार आहे. चव्हाण यांना भाजपने चौथ्यांदा उमेदवारी दिली असून म्हात्रे हे दुसऱ्यांदा चव्हाण यांच्यासमोर विधानसभा निवडणूक लढत आहेत. 

कल्याण पूर्व मतदार संघात भाजपने सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. सुलभा यांचे पती आ. गणपत गायकवाड यांनी शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यामुळे महेश यांनी बंडखोरी केली आहे. त्यांची बंडखोरी सुलभा यांना डोकेदुखी ठरणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. महाविकास आघाडीने धनंजय बोडारे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे सचिन पोटे यांनी बंडखोरी केली होती. मात्र, ती रोखण्यात महाविकास आघाडीला यश आले. 

कल्याण पश्चिम मतदारसंघातून शिंदेसेनेकडून विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात उद्धवसेनेचे सचिन बासरे यांच्यात लढत होणार आहे. भाजपचे माजी 
आ. नरेंद्र पवार यांची बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आले. मात्र, भाजपचे वरुण पाटील यांचे बंड कायम आहे. काँग्रेसचे राकेश मुथा यांची बंडखोरी बासरे यांची डोकेदुखी वाढवू शकते. 

कल्याण ग्रामीण मतदारसंघ मनसेकडून राजू पाटील, उद्धव सेनेकडून सुभाष भोईर, तर शिंदे सेनेकडून राजेश मोरे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. कल्याण लोकसभा निवडणुकीत मनसेची साथ शिंदेसेनेला मिळाली. त्यामुळे शिंदेसेना पाटील यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही, अशी अपेक्षा होती; परंतु मोरे यांनी अर्ज दाखल केला. तीन सेनांचे उमेदवार रिंगणात असल्याने मराठी भाषकांच्या मतांचे  विभाजन होण्याची शक्यता आहे. 

ऐरोली, बेलापुरात शिंदेसेनेचे बंड
ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक यांच्या विरोधात शिंदेसेनेच्या विजय चौगुले यांनी, तर बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात शिंदेसेनेच्या विजय नहाटा यांनी बंडखोरी केली आहे. नाईक यांच्या विरोधात उद्धवसेनेचे एम. के. मढवी, तर म्हात्रे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे संदीप नाईक हे रिंगणात आहेत. शिंदेसेनेच्या बंडखोरीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मीरा-भाईंदर मतदारसंघात विद्यमान आ. गीता जैन, भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता व काँग्रेसचे उमेदवार मुजफ्फर हुसैन अशी तिरंगी लढत आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील भीषण वाहतूक कोंडी व त्यामुळे होणारी कुचंबणा
रेल्वे वाहतुकीचा घोळ व त्यातून होणारा लेटमार्क आणि रेल्वेतून पडून होणारे मृत्यू
जिल्ह्यातील सर्व शहरांमधील नागरिकांना भेडसावणारी प्रचंड पाणीटंचाई
जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील कचऱ्याची समस्या. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता व्यवस्थेचा अभाव
वाढती गुन्हेगारी ही देखील या ठिकाणची मोठी समस्या बनली आहे. अपुरे पोलिस बळ व त्या तुलनेत वाढती लोकसंख्या याचा मेळ बसत नाही.

भिवंडीत उद्धवसेनेच्या बंडखोराची माघार
भिवंडी पूर्व मतदारसंघात महाविकास आघाडीने समाजवादी पक्षाचे रईस शेख निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्या विरोधात उद्धवसेनेचे रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी केली होती. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतला. भिवंडी पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे दयानंद चोरघे यांना उमेदवारी दिली. चोरघे यांच्या विरोधात माजी महापौर विलास पाटील यांनी बंडखोरी केली. भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये शिंदेसेनेचे शांताराम मोरे यांच्या विरोधात भाजपच्या स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली. 

उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी विरुद्ध शरद पवार गटाचे ओमी कलानी अशी लढत होत आहे. अजित पवार गटाचे भारत गंगोत्री यांनी बंड केले. महायुतीला हे बंड रोखता आले नाही. मुरबाड मतदारसंघात भाजपचे किसन कथोरे विरुद्ध शरद पवार गटाचे सुभाष पवार यांच्यात लढत आहे. शरद पवार गटाचे शैलेश वडनेरे यांचे बंड कायम आहे. अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे बालाजी किणीकर विरुद्ध उद्धवसेनेचे राजेश वानखेडे यांच्यात सामना आहे. येथे काँग्रेसचे सुमेध भवार यांनी बंड केले आहे. शहापूरमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा विरुद्ध शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांच्यात थेट सामना आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Battle for supremacy in Thane; Out of 19 constituencies, insurgency eclipsed in six places, Shiv Sena Shinde, Shiv Sena UBT along with BJP is also trying to be the big brother in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.