मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 11:05 AM2024-11-19T11:05:25+5:302024-11-19T11:08:23+5:30

या पक्ष प्रवेशामुळे मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला 'जोर का झटका' दिला असल्याची चर्चा डोंबिवलीत रंगली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 - Deputy leader of Uddhav Thackeray party Sadanand Tharwal entered Shiv Sena in the presence of Eknath Shinde | मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा

मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा

डोंबिवली - राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मतदानाला आता काही तास उरले आहेत. त्यातच डोंबिवली येथे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते आणि शहरप्रमुखपदाची जबाबदारी असणारे सदानंद थरवळ यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. डोंबिवली मतदारसंघात थरवळ निवडणूक लढवू इच्छित होते. मात्र या मतदारसंघात ऐनवेळी शिंदे गटातून आलेल्या दीपेश म्हात्रे यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली. म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यामुळे सदानंद थरवळ आणि समर्थकांनी नाराजी व्यक्त करत शहरप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. अखेर सदानंद थरवळ आणि इतरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. 

सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केले होते. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड करताच ठाणे जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी शिंदेसोबत गेले. मात्र त्यावेळीही उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहून सदानंद थरवळ यांनी पक्षाचे काम सुरू ठेवले. मात्र असे असूनही विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिली. त्यामुळे सदानंद थरवळ नाराज झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षातील प्रचारापासून दूर राहिले आणि अखेर त्यांनी आज पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. सोमवारी संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन थरवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला. 

तर गेली अनेक वर्षे आपण चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो. मात्र सच्चा शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत आहे. याचे आनंद आणि समाधान वाटतंय असं सदानंद थरवळ यावेळी म्हणाले. 

दरम्यान, सदानंद थरवळ हे शिवसेनेतील ज्येष्ठ शिवसैनिक असून गेली कित्येक वर्षे आम्ही सगळ्यांनी मिळून पक्षात एकत्रच काम केले होते. डोंबिवली मधील सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. डोंबिवली मध्ये काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या होत्या, आज त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकाचा आणि त्यांचा मुलगा अभिजितचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश होत असल्याचा विशेष आनंद मला होतो आहे. आता पुन्हा एकदा त्याच जोमाने आम्हाला पक्षवाढीसाठी एकत्र काम करता येईल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. त्याशिवाय या पक्ष प्रवेशामुळे मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला 'जोर का झटका' दिला असल्याची चर्चा डोंबिवलीत रंगली आहे

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Deputy leader of Uddhav Thackeray party Sadanand Tharwal entered Shiv Sena in the presence of Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.