दिवाळीच्या चार दिवसांत उमेदवारांची ‘फराळ डिप्लोमसी’; कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन घेत आहेत भेटीगाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 09:52 AM2024-11-02T09:52:42+5:302024-11-02T09:53:16+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे शहरात सध्या चारही विधानसभा मतदारसंघांत दिवाळीमुळे सध्या उमेदवारांचा खुला प्रचार सुरू नाही.
Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारपासून उडणार असल्याने दिवाळीच्या पाच दिवसांत बहुतेक उमेदवार मतदारसंघातील नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. उमेदवार घरी आलाय म्हटल्यावर दिवाळी फराळाचा आग्रह होणे स्वाभाविक आहे. मग कुठे चकलीचा तुकडा मोड, तर कुठे अर्धा लाडू तोंडात टाक असे करावे लागते. ज्या कार्यकर्त्यांच्या मदतीने निवडणुकीचे मैदान मारायचे तो नाराज होऊ नये, यासाठी दिवाळी ‘फराळ डिप्लोमसी’ सुरू आहे.
ठाणे शहरात सध्या चारही विधानसभा मतदारसंघांत दिवाळीमुळे सध्या उमेदवारांचा खुला प्रचार सुरू नाही. दीपावलीच्या चार दिवसांच्या कालावधीत उमेदवार आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या, मतदारसंघातील मान्यवर व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाल्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारीदेखील आपल्या उमेदवाराची भेट घेण्यासाठी आतुर असतात. ते निराशा होऊ नये म्हणून उमेदवारांनी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घरी दिवाळीच्या फराळाचा बेत आखला आहे.
त्यातही पक्षातील नाराज झालेले पदाधिकारी, बंडखोरांच्या संपर्कात असलेले पदाधिकारी, नाराजीमुळे अर्ज भरण्याची भाषा केलेले; परंतु अर्ज न भरलेल्या पदाधिकाऱ्यांचे घर गाठून दुरावा कमी करण्याचा प्रयत्न दिवाळीच्या चार दिवसांत केला जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या घरचेच दिवाळीचे गोडधोड पदार्थ त्याला भरवून त्याचे फोटो पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, उमेदवारांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करून नाराजांची नाराजी कशी काबूत आणलीय, असे पर्सेप्शन निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कुणाकडे उटणे, तर कुणाकडे पोहोचले दिवाळीचे साहित्य
उमेदवारांनी मतदाराच्या घरी जाणे जरी टाळले असले तरी मतदारांच्या घरी काही उमेदवारांकडून दिवाळीचे साहित्य पोहोचले आहे. काही उमेदवारांनी मतदारांच्या घरी दिवाळी फराळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, पणत्या, उटणे असे साहित्य पाठविले आहे. खास करून झोपडपट्टी भागात अशा साहित्याचे वाटप झाले आहे.
ठाण्यातील काँग्रेसच्या एका बंडखोर उमेदवाराने दिवाळीत थेट दिल्ली गाठून आपल्या नेत्याची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. काही बंडखोरांनीही कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या घरी जाऊन त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.