Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 14:43 IST2024-11-20T14:42:40+5:302024-11-20T14:43:56+5:30
Maharashtra Assembly Election 2024 And Kedar Dighe : महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यासाठी आता मतदारराजा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे. याच दरम्यान आता केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मतदारसंघात केदार दिघे यांच्या गाडीतून दारू आणि पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गाडीतून दारू आणि पैसे वाटप करत असताना केदार दिघे स्वतः गाडीत उपस्थित होते आणि वाटप करत असताना शिंदेंच्या शिवसैनिकांनी त्यांना रंगेहाथ पकडलं. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी वर्षा भोसले यांच्या तक्रारीवरून कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार म्हणून केदार दिघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्यात बदललेली राजकीय समीकरणं पाहता, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे.