येत्या २३ तारखेला देवदिवाळी साजरी करू - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 10:21 AM2024-10-31T10:21:45+5:302024-10-31T10:21:58+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : कोपरीतील अष्टविनायक चौक येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने स्वरदीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे : दिवाळीत फटाके, लवंग्या-बिवंग्या फुटतील. मात्र, आपलाच महायुतीचा ॲटमबॉम्ब फुटेल आणि येत्या २३ तारखेला आपण मोठी देवदिवाळी साजरी करायची असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. त्यासाठी सर्व मतदारांनी २० तारीख लक्षात ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.
कोपरीतील अष्टविनायक चौक येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने स्वरदीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे बोलत होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना नियम पाळायचे आहेत. आपण नियम पाळणारे लोक आहोत. ही दिवाळी लाडक्या बहीण, लाडके भाऊ यांच्यासह सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची जावो.
मागील अडीच वर्षांत राज्यात अनेक लोकाभिमुख कामे केली. लोकहिताचे निर्णय घेतले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, भगिनी, ज्येष्ठ सगळ्यांना आनंद, समाधान वाटेल, असे सर्वस्पर्शी निर्णय घेतले. तुम्ही मला आमदार केले, त्यामुळे मी मुख्यमंत्री होऊ शकलो. त्यातूनच हे वेगवान निर्णय घेण्याचे भाग्य मला लाभल्याचेही ते म्हणाले.