शिंदे पिता पुत्रांवर मनसे आमदाराचा हल्लाबोल; "जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 05:43 PM2024-11-04T17:43:01+5:302024-11-04T17:45:19+5:30
विधानसभा निवडणुकीत शिंदे सेना आणि मनसेत जोरदार जुंपली आहे. कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटलांविरोधात शिंदेंनी त्यांचा उमेदवार उतरवला आहे.
डोंबिवली - जे बाळासाहेब ठाकरे यांचे झाले नाहीत ते राजसाहेबांचे काय होणार? या बाप बेट्याची दानत मला माहिती आहे असं सांगत येणाऱ्या निवडणुकीत वचपा काढणार असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला आहे. कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाकडून राजेश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यात ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर आणि मनसेकडूनराजू पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. लोकसभेला राज ठाकरे यांच्या मनसेनं नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसे आणि शिंदे सेनेत बिनसलं आहे.
आमदार राजू पाटील म्हणाले की, आम्हाला राजसाहेबांनी आदेश दिला, आम्ही लोकसभेला झोकून काम केले. ते ठाणे, कल्याणमध्ये निवडून आले. परंतु ते इथे उमेदवार देणार नाहीत अशी मला अपेक्षा नव्हती. आपल्याविरोधात उमेदवार येणार हे मी सहकाऱ्यांना सांगितले होते. मला या बाप बेट्याची दानत माहिती आहे. जे बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाहीत ते राजसाहेबांचे होणार आहेत का...? मला स्थानिक राजकारणी म्हणून ही कल्पना होती. मला जो ५ वर्ष या लोकांनी त्रास दिला. त्यात सूडाची भावना ठेवून उमेदवार देणार हे मला माहिती होते असा आरोप त्यांनी केला.
तसेच माझ्या मनातला जो काही राग आहे तो मी या विधानसभेला बोलून काढणार. मलाही काही गोष्टी बोलायच्या होत्या. पक्षप्रमुखांनी आम्हाला आदेश दिल्यानंतर आम्ही प्रामाणिकपणे काम केले. परंतु याच लोकांनी मला संधी दिली त्यामुळे वचपा काढणार. खूप अडचणी दिल्या. कामात खोडा घातला. कल्याण ग्रामीणमध्ये चांगली लढत आहे. तिरंगी लढतीत आम्ही जिंकणार. गाणेही वाजणार आणि या लोकांनाही वाजवणार असा टोला राजू पाटील यांनी शिंदे पिता पुत्रांना लगावला.
दरम्यान, ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असला तरी कल्याण ग्रामीण मनसेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात मनसेचा एकमेव आमदार जनतेने निवडून दिलेला आहे. त्या जनतेचा सन्मान ठेवण्यासाठी राज ठाकरे इथून प्रचाराचा शुभारंभ करतायेत. विधानसभेच्या प्रचाराचा नारळ येथून फुटणार ही महाराष्ट्र सैनिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे . राज ठाकरेंचं माझ्यावर, अविनाश जाधव यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे ही पहिली सभा घेतली असंही आमदार राजू पाटील यांनी सांगितलं.