ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत बंडोबा जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 01:37 PM2024-10-30T13:37:22+5:302024-10-30T13:44:23+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : आता येत्या ४ नोव्हेंबरपूर्वी बंडोबांना थंड करण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे आहे. ४ नोव्हेंबरनंतर नेमक्या किती मतदारसंघांत किती बंडखोर राहतात, हे स्पष्ट होईल.

Maharashtra Assembly Election 2024 : Out of 18 assembly constituencies in Thane district, Rebel is in full swing in 13 constituencies | ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत बंडोबा जोरात

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत बंडोबा जोरात

Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत महायुती अथवा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध त्याच पक्षाच्या किंवा मित्रपक्षाच्या इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. ठाणे शहर, ओवळा-माजिवडा, मुंब्रा-कळवा, डोंबिवली व शहापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत ठळक बंडखोरी दिसत नाही.

महायुतीमहाविकास आघाडीमधील प्रत्येकी तीन पक्षांतील इच्छुकांची संख्या जास्त असल्याने व पक्षांमध्ये समन्वय नसल्याने घाऊक बंड झाले आहे. आता येत्या ४ नोव्हेंबरपूर्वी बंडोबांना थंड करण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे आहे. ४ नोव्हेंबरनंतर नेमक्या किती मतदारसंघांत किती बंडखोर राहतात, हे स्पष्ट होईल.

पाचपाखाडीमध्ये... 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडीतून स्व.आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धवसेनेतर्फे रिंगणात उतरले आहेत. येथे काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मविआच्या मतविभाजनाचा शिंदे यांना फायदा होऊ शकतो. 

ऐरोली, बेलापुरात... 
ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक (भाजप) विरुद्ध उद्धवसेनेचे एम.के. मढवी अशी लढत असताना शिंदेसेनेच्या विजय चौगुले यांनी रिंगणात उडी मारली आहे. बेलापूरमध्ये गणेश नाईक यांचे पुत्र संदीप यांनी अलीकडेच शरद पवार गटात प्रवेश करून भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात बंड केले. शिंदेसेनेचे विजय नहाटा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. 

मीरा-भाईंदरमध्ये भाजपला भीती?
मीरा-भाईंदरमध्ये गेल्या वेळी अपक्ष निवडणूक लढवून विजयी झालेल्या गीता जैन यांनी आणि भाजपचे नेते नरेंद्र मेहता यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपने ऐनवेळी गीता जैन यांना डावलून मेहता यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे जैन यावेळीही पुन्हा अपक्ष रिंगणात आहेत. याखेरीज भाजपमधील सुरेश खंडेलवाल (अपक्ष), अजित पवार गटाचे अरुण कदम (अपक्ष) यांनीही बंडाचे निशाण फडकवले आहे.

कल्याण ग्रामीणचा तिढा
कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील विजयी झाले होते. मनसेने लोकसभेत दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्याकरिता पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल न करण्याकरिता भाजपचा दबाव असतानाही शिंदेसेनेचे राजेश मोरे यांनी रिंगणात उडी घेतली आहे. कदाचित मुंबईतील माहीम व कल्याण ग्रामीणचा तिढा एकाच वेळी सुटेल. 

कल्याण पूर्व आणि पश्चिम 
कल्याण पूर्वेत भाजपने सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत उद्धवसेनेच्या धनंजय बोडारी यांच्याशी असतानाही शिंदेसेनेचे महेश गायकवाड (अपक्ष) यांनी, तर काँग्रेसच्या सचिन पोटे (अपक्ष) यांनी अर्ज दाखल करून दोन्ही अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. 
कल्याण पश्चिममध्ये शिंदेसेनेच्या विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात नरेंद्र पवार व वरुण पाटील या भाजपच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे राकेश मुथा व राजाभाऊ पातकर यांनी बंडखोरी करून उद्धवसेनेचे सचिन बासरे यांची चिंता वाढविली आहे. 

उल्हासनगरात काय?
उल्हासनगरात भाजपचे कुमार आयलानी व शरद पवार गटाचे ओमी कलानी, असा सामना असताना अजित पवार गटाचे भरत गंगोत्री यांनी रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन होण्याची भीती आहे.

अंबरनाथ, मुरबाडमध्ये चिंता कुणाला?
अंबरनाथमध्ये सुमेध भवार या काँग्रेस पदाधिकाऱ्याने बंड केले आहे. मुरबाडमध्ये किसन कथोरे विरुद्ध सुभाष पवार या लढतीत शरद पवार गटाचेच शैलेश वडनेरे यांच्या बंडामुळे पक्षाची चिंता वाढली. 

भिवंडी पूर्व, पश्चिम वादात
भिवंडी पूर्वेत सपाच्या रईस शेख यांच्या विरुद्ध उद्धवसेनेच्या रूपेश म्हात्रे यांनी शड्डू ठोकला, तर भिवंडी ग्रामीणमध्ये भाजपच्या स्नेहा पाटील यांनी शिंदेसेनेचे शांताराम मोरे यांच्या विरोधात मैदानात उडी घेतली. भिवंडी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसच्या दयानंद चोरघे यांच्या विरोधात काँग्रेसचे विलास पाटील यांनी बंड केले आहे. एमआयएमकडून तुरुंगात असलेले खालिद गुड्डू व वारीस पठाण यांचेही अर्ज आहेत.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Out of 18 assembly constituencies in Thane district, Rebel is in full swing in 13 constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.