केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:40 PM2024-10-30T12:40:27+5:302024-10-30T12:41:15+5:30

ठाणे शहर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असून त्यात संजय केळकर, राजन विचारे आणि अविनाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

Maharashtra Assembly Election 2024 - Rajan Vikhare objected to BJP Sanjay Kelkar candidature form in Thane City Constituency | केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?

केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?

ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष ठाण्यातील विविध मतदारसंघावर लागलं आहे. त्यात ठाणे शहर मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे संजय केळकर, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेकडून अविनाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता आयोगाकडून अर्जाची छाननी सुरू झाली आहे. त्यात ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी भाजपाच्या संजय केळकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे.

संजय केळकर यांनी ठाणे शहर मतदारसंघातून भाजपा महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. तर राजन विचारे या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवत आहेत. २९ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर राजन विचारे यांनी संजय केळकर यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. संजय केळकर यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपवली त्यामुळे केळकरांचा अर्ज बाद व्हावा अशी मागणी विचारेंनी केली आहे. याबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार असून निवडणूक अधिकारी यावर काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. 

राजन विचारेंनी घेतलेली हरकत मान्य करत निवडणूक अधिकाऱ्यांनी संजय केळकर यांचा उमेदवारी अर्ज बाद केला तर ठाणे शहर मतदारसंघात राजन विचारेविरुद्ध मनसेचे अविनाश जाधव अशी लढत होण्याची शक्यता आहे. जर फॉर्म बाद न करण्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला तर ठाण्यात तिरंगी सामना रंगणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत पराभव

ठाण्यातील लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत महायुतीच्या नरेश म्हस्के यांच्याकडून विचारेंचा तब्बल दीड ते दोन लाख मतांनी पराभव झाला. त्यानंतर राजन विचारे आता विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांचा सामना सोपा नाही. या मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर हे आहेत. तर मनसेचे अविनाश जाधव यांनीही इथं जोरदार तयारी केली आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Rajan Vikhare objected to BJP Sanjay Kelkar candidature form in Thane City Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.