येत्या २३ तारखेला बॉम्ब फोडायचाय - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 11:01 AM2024-10-31T11:01:19+5:302024-10-31T11:01:57+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : ठाण्यातील महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी ही टीका केली.
Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे : येत्या २० तारखेला वात पेटवायची आणि २३ तारखेला बॉम्ब फोडायचा असल्याचे आवाहन शरद पवार गटाचे मुंब्रा-कळव्यातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केले. महायुतीचे सरकार आल्यापासून राज्यात बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे हे महायुतीचे सरकार आपल्याला घालवायचेच आहे, असे आवाहन त्यांनी केले. ठाण्यातील महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी ही टीका केली.
यावेळी त्यांच्या समवेत उद्धव सेनेचे राजन विचारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, आप, धर्मराज्य पक्ष आणि इतर घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकदिलाने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या काहींनी बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत.
याबाबत छेडले असता, आव्हाड म्हणाले की, सर्वांनाच आघाडीचा धर्म पाळावा लागेल. व्यक्ती मोठा नसून पक्ष मोठा असतो. विधानसभेच्या जागा न मिळाल्याने काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले होते. परंतु त्यांची मनधरणी वरिष्ठांनी केली. बुधवारी झालेल्या बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.