मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध ठाण्यामध्ये उद्धवसेनेचे ‘दिघे कार्ड’
By अजित मांडके | Published: October 29, 2024 10:27 AM2024-10-29T10:27:48+5:302024-10-29T11:37:49+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्र्यांचे मताधिक्य वाढणार?; मनसेकडून उमेदवार नाही
Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे : कोपरी-पाचपाखाडी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी त्यांची लढत उद्धवसेनेचे केदार दिघे यांच्याशी होत आहे. केदार हे स्व. आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. दिघे यांच्या पुतण्याला उमेदवारी देण्याची उद्धवसेनेची खेळी कितपत यशस्वी ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मनसे या ठिकाणी आपला उमेदवार न देता, मैत्री निभावणार, असे स्पष्ट संकेत आहेत. कोपरी - पाचपाखाडीतून प्रत्येक वेळी शिंदे यांचे मताधिक्य वाढत आहे.
यावेळी ते मुख्यमंत्री असल्यामुळे आणखी वाढणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. २००९ मध्ये शिंदे येथून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेना दोन गटांत विभागल्याने उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना असा सामना रंगणार आहे. यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत होत होती. या वेळेस काँग्रेसकडून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात उद्धवसेनेला यश आले.
स्व. आनंद दिघे यांचे शिष्य असलेल्या शिंदे यांच्या विरोधात दिघे यांचे पुतणे केदार दिघे लढत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिंदे यांच्यासोबत वरचेवर भेटीगाठी सुरू असतात. त्याचा परिपाक म्हणून मनसेने शिंदे यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठी मतांचे विभाजन टळेल व शिंदे विरुद्ध दिघे थेट लढत होईल.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला असून, त्यांना या मतदारसंघातून निर्णायक लीड घ्यावा लागणार. शिंदेंसमोर ‘दिघे कार्ड’ खेळविण्याची रणनीती यशस्वी होणार का, याची चर्चा सुरू आहे.
या भागात सर्वांत मोठी एमआयडीसी आहे. मात्र, येथील उद्योगधंदे बंद पडले आहेत. क्लस्टरच्या माध्यमातून सुरू झालेला विकास अद्याप पूर्णत्वाकडे गेलेला नाही. कोळीवाड्यांचा प्रश्न, मैदानांचा अभाव, वाहतूककोंडी सुटू शकलेली नाही.
लोकसभेमध्ये काय घडले; परिणाम काय?
लोकसभेमध्ये शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशीच लढत झाली होती. शिंदेसेनेकडून नरेश म्हस्के तर उद्धवसेनेकडून राजन विचारे रिंगणात होते. म्हस्के
यांना कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निर्णायक लीड मिळाला होता.
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे नरेश म्हस्के यांना १ लाख ११ हजार १३५ मते मिळाली तर, उद्धवसेनेचे राजन विचारे यांना ६६ हजार २६० मते मिळाली.