गुजरात-राजस्थानातून येणारे बोगस मतदार, काळ्या पैश्यांना रोखण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी
By धीरज परब | Published: November 18, 2024 10:18 PM2024-11-18T22:18:39+5:302024-11-18T22:18:39+5:30
यंदाच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील महानगरात खूप मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुजरात - राजस्थान मधून बोगस मतदार व काळा पैसा आणला जात असल्याने याप्रकरणी निवडणुका आयोगासह पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील महानगरात खूप मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. १४५ मीरा.भाईंदर या मतदार संघात, नजीकच्या काही महिन्यातच ६८ हजार पेक्षा अधीक मतदारांची नवीन नावे नोंदणी झाली आहे. याचे आकलन केले असता, ६०% नावे बोगस असल्याचे समजते. ही बहुतेक नावे धारण करणारी मंडळी, गुजरात, राजस्थान राज्यातून निवडणूकीच्या दिवशी येणार असून, दि. १९ ते २० रोजी महाराष्ट्र राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार आपल्या राज्यात शेजारच्या राज्यातून प्रवेश कराणार असल्याचे माहीती खात्रीलायक सूत्रांकडून समजली आहे असे एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, प्रदिप सामंत यांनी तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे.
या दिवशी बोगस मतदान होण्यासाठी, मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी, मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक ठेवण्यासाठी, वरील दोन दिवसंच्या कालावधीत, गुजरात, राजस्थान राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणा-या खाजगी (बस) प्रवासी वाहनांवर बंदी घालण्यात यावी. छोट्या चार चाकी वाहनांची व त्यामधील प्रवाशांची कसून चौकशी करावी. त्यांचा राज्यात प्रवेश करण्याचा हेतू तपासून घ्यावा.
पश्चिम दृतगती महामार्ग (चारोटी चेकनाका) व डांग प्रांतातून नाशिकच्या दिशेने येणा-या महामार्गावर विशेष तपासणी चौक्या उभारणे अतिशय आवश्यक आहे. सुरत वरुन डहाणू मार्गे रेल्वेगाड्यातून येणा-या प्रवाशांना रोखणे व तपासणी आवश्यक आहे.
कोविड टाळेबंदीच्या काळात जंतू संसर्ग होऊ नये, म्हणून अशी नाकेबंदी करण्यात आली होती, राज्याच्या सिमा सिलबंद करण्यात आल्या होत्या. त्या अनुभवावरुन, निवडणूक आयोगाला वरीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे सहज शक्य आहे.
राज्यातील निवडणूक प्रक्रिया बोगस मतदानाने व आर्थिक प्रलोभनाने प्रभावित होऊ नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. मीरा भाईंदर च्या २०१४ सालच्या विधानसभा निडणुक वेळी राई खाडी येथे गुजरातच्या नागरिकांची असंख्य बनावट पॅनकार्ड, यादी आदि सापडले होते याची आठवण सामंत यांनी करून दिली आहे.