मतमोजणी केंद्र इमारतीच्या १०० मीटर परिसरात नागरिकांवर राहणार बंदी

By जितेंद्र कालेकर | Published: November 22, 2024 09:35 PM2024-11-22T21:35:26+5:302024-11-22T21:35:26+5:30

याबाबतचा मनाई आदेश विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी शुक्रवारी काढले आहेत.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 citizens are prohibited from staying within 100 meters of the counting center building | मतमोजणी केंद्र इमारतीच्या १०० मीटर परिसरात नागरिकांवर राहणार बंदी

मतमोजणी केंद्र इमारतीच्या १०० मीटर परिसरात नागरिकांवर राहणार बंदी

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विधानसभा निवडणूकीची मतमोजणी शनिवारी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील १४ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणी केंद्र इमारतीच्या १०० मीटर परिसरात नागरिकांना येण्याला प्रतिबंध घातले आहेत. याबाबतचा मनाई आदेश विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी शुक्रवारी काढले आहेत.

आपल्या आदेशामध्ये उपायुक्त मकवाना यांनी म्हटले आहे की, ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ओवळा माजीवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा कळवा हे १४ मतदारसंघ आहेत. सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणी केंद्रावर शांतता आणि सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने याठिकाणी योग्य तो प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. त्यासाठी मतमोजणी इमारतीच्या १०० मीटर परिसरात कर्तव्यावरील निवडणूक अधिकारी, कर्मचारी, उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी आणि निवडणूक आयोगाद्वारे अधिकृत केलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना याठिकाणी प्रवेश बंदी राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

शस्त्रावरही राहणार बंदी-

मतमोजणी केंद्राच्या परिसरात कोणालाही शस्त्र घेऊन जाण्याला परवानगी दिलेली नाही. या भागात १०० मीटर परिसरातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भागात वाहने आणण्यास तसेच मोर्चा आणि निदर्शनालाही बंदी आहे. त्याचबराेबर १०० मीटर परिसरात ध्वनीक्षेपक, वाद्य किंवा कोणतेही ध्वनी प्रदुषण करणाऱ्या साधनांच्या वापरावर बंदी राहणार आहे. हा आदेश २३ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 citizens are prohibited from staying within 100 meters of the counting center building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.