ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 06:02 AM2024-10-24T06:02:43+5:302024-10-24T06:04:02+5:30
शिंदेसेनेने ठाण्यात भाजपचे दाबले नाक
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे नेते संजय भोईर यांनी भाजप उमेदवार संजय केळकर यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकाविण्याची तयारी सुरू करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून भाजप उमेदवार रिंगणात उडी घेईल, असा इशारा भाजपने दिला आहे.
ठाणे शहर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आ. संजय केळकर, मनसेचे अविनाश जाधव हे रिंगणात उतरले असताना हा मतदारसंघ शिंदेसेनेला न मिळाल्याने नाराज झालेले संजय भोईर यांनी अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या.
माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज नेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. लागलीच भाजपने मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघावर दावा ठोकला. लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघ मागून भाजपने पालघर मतदारसंघ सोडवून घेतला होता. यावेळी या दबावतंत्राचा वापर करून शिंदेसेना की भाजप एखादा मतदारसंघ खेचून घेण्यात यशस्वी होते, याकडे लक्ष लागले आहे.
शिंदेसेना नाराज?
भाजपबरोबर शिंदेसेनेच्या वाटाघाटी सुरू असताना भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात ठाणे जिल्ह्यातील काही उमेदवार जाहीर केले. त्यामुळे शिंदेसेना नाराज झाली आहे. ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिंदेसेनेला काही मतदारसंघ हवे आहेत. उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, मीरा-भाईंदर अशा काही मतदारसंघांवर दावा करण्याकरिता शिंदेसेनेने ठाणे मतदारसंघात भाजपचे नाक दाबले आहे. लोकसभेला असाच प्रयत्न भाजपने केला होता.
भाजपचे पाटणकरांचे बंड की डमी उमेदवार?
ठाणे शहर मतदारसंघातून अर्ज दाखल करण्याकरिता भाजपचे माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज घेतला. त्यामुळे पाटणकर हे केळकर यांच्या विरोधात बंडखोरी करणार, अशी चर्चा आहे. पाटणकर अपक्ष निवडणूक लढवतील असे समजते. मात्र, पाटणकर यांना भाजपने डमी उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे, अशी चर्चा आहे.