श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 05:15 PM2024-11-11T17:15:29+5:302024-11-11T17:18:00+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील संभाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत श्रीकांत शिंदे, पीआरपीचे जयदीप कवाडे यांनी मार्गदर्शन केले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरपूर्वेतील व्यापाऱ्यांच्या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहिल्याच्या रागातून व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बालाजी किणीकर यांनी व्यापाऱ्याची माफी मागून त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उपस्थितीत होते.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील संभाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत श्रीकांत शिंदे, पीआरपीचे जयदीप कवाडे यांनी मार्गदर्शन केले. सभेनंतर रात्री १० वाजता भाजपचे नेते राजा गेमनानी यांनी व्यापाऱ्यांची श्रीकांत शिंदे, गोपाळ लांडगे व बालाजी किणीकर यांच्यासोबत बैठक ठेवली होती. मात्र वेळ देऊनही खासदार आले नाही. याचा राग व्यापाऱ्यांना येऊन त्यांनी किणीकर व लांडगे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
अखेर लांडगे यांनी शिंदे यांना व्हिडीओ कॉल करून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सांगितले. शिंदे यांनी पुढच्या वेळी नक्की भेटतो. असे सांगितल्याने, व्यापाऱ्यात रोष वाढला. यादरम्यान राजेंद्र. चौधरी यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. व्यापाऱ्याचा राग शमविण्यासाठी अखेर बालाजी किणीकर यांनी माफी मागून वेळ मारून नेली. तसेच व्यापाऱ्यांच्या प्रत्येक कामाला जातीने लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
व्यापाऱ्यांनीही सहकार्य करण्याचे सांगून व्यापाऱ्यांची नाराजी दूर झाल्याचे सांगितले. मात्र या एक दीड तासाच्या मानअपमान नाट्याने, किणीकरांची अवस्था दैयनीय झाली होती. गोपाळ लांडगे यांनाही येथे काय बोलावे सुचत नोव्हते. शिंदे यांचे कान फुकून कोणी येण्यास अडसर निर्माण केला. या चर्चेलाही उधाण आले होते.