बाल विज्ञान परिषदेत महाराष्ट्र चमकला, तीन प्रकल्प टॉपरच्या यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 05:39 AM2018-01-01T05:39:49+5:302018-01-01T05:40:19+5:30
अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत भारतातून टॉप १५ प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील तीन प्रकल्पांची निवड झाली आहे. या तीनमध्ये ठाणे, मुंबई आणि कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश झाला आहे.
ठाणे : अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत भारतातून टॉप १५ प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील तीन प्रकल्पांची निवड झाली आहे. या तीनमध्ये ठाणे, मुंबई आणि कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश झाला आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजिली जाते. यंदाची ही २५ वी परिषद आहे. २७ ते ३१ डिसेंबरदरम्यान अहमदाबाद येथे ही राष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेत महाराष्ट्रातील ३०, तर ठाणे जिल्ह्यातील ४ प्रकल्प सादर झाले होेते. त्यातील तीन प्रकल्पांची टॉप १५ मध्ये निवड झाली आहे. त्या तीन प्रकल्पांमध्ये मुंबईच्या पार्ले येथील मूकध्वनी विद्यालयाच्या नेहा शेख यांचा ‘कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन फॉर एक्सटेंडिंग लाइफ आॅफ हिअरिंग एड’ हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प हिंदीमध्ये होता. ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलच्या तेजस्विनी देशमुख यांचा ‘इम्पॅक्ट आॅफ वेहिक्युलर पल्युशन आॅफ ट्रॅफिक पोलीस’ हा प्रकल्प इंग्रजीमध्ये असून तो निवडला आहे. तिसरा प्रकल्प हा कोल्हापूरच्या श्री. एस.एच.पी. हायस्कूल आणि आनंदरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या मधुबाला मगदूम यांचा ‘टू स्टडी द इफेक्ट आॅफ अझोला आॅन प्रॉडक्शन आॅफ काउस मिल्क’ हा असून तो मराठीमध्ये मांडला आहे. या प्रकल्पांना जिज्ञासा ट्रस्टने मार्गदर्शन केले होते. जिज्ञासा ट्रस्ट ठाणे ही संस्था महाराष्टÑात विज्ञान परिषदेची समन्वयक संस्था म्हणून काम करते. रविवारी परिषदेच्या शेवटच्या दिवशी निवडक प्रकल्पांची नावे जाहीर करण्यात आली.