Maharashtra Election 2019: भाजपा उमेदवार म्हणतो, पंतप्रधान देवेंद्र फडणवीसांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 11:21 AM2019-10-05T11:21:10+5:302019-10-05T11:23:02+5:30
भाजपाच्या उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल
उल्हासनगर: भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काल कुमार आयलानी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. मात्र यावेळी त्यांनी चांगलाच घोळ घातला. मी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानू इच्छितो, असं आयलानी म्हणाले. यावरुन सध्या विरोधकांनी आयलानी यांना लक्ष्य केलं आहे.
काल विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपा उमेदवार कुमार आयलानी त्यांच्या समर्थकांसह अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. मात्र आयलानी फडणवीसांना मुख्यमंत्री नव्हे, तर पंतप्रधान बोलून गेले. आपली चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
कुमार आयलानी याआधीही त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीचा त्यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं. मात्र त्यांनी मोदींची स्तुती करताना कलम ३०७ म्हटलं. कलम ३०७ हत्येचा प्रयत्न केल्यावर दाखल केलं जातं.