Maharashtra Election 2019: रिपाइंची बंडखोरी मोडण्यासाठी भाजपची व्यूहरचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 05:39 AM2019-10-11T05:39:07+5:302019-10-11T05:39:19+5:30
उल्हासनगर मतदारसंघात आयलानी विरुद्ध कलानी यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे होती.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : रिपाइंची बंडखोरी मोडीत काढण्यासाठी भाजपने मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारच्या सभेत केंद्रीय मंत्री आठवले यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यांनी सभेला येण्यास टाळले तर, रिपाइंच्या बंडखोर उमेदवाराला आठवले यांचा पाठिंबा असल्याचे उघड होणार आहे. त्यामुळे सत्तेत असूनही, रिपाइंने उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात केलेला बंडखोरीचा मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला आहे.
उल्हासनगर मतदारसंघात आयलानी विरुद्ध कलानी यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे होती. यादरम्यान रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष व गटनेते भगवान भालेराव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारासिंगे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन भगवान भालेराव व अंबरनाथ मतदारसंघातील रामभाऊ तायडे हे रिपाइंचे अधिकृत उमेदवार असून काही तांत्रिक कारणामुळे एबी फॉर्म देता आले नसल्याचे सांगितले होते. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले स्वत: प्रचारात उतरणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. महायुतीमध्ये सहभागी असलेल्या रिपाइंच्या उमेदवाराने बंडखोरी केल्याने, भाजपचे कुमार आयलानी यांची डोकेदुखी वाढली. भालेराव यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी त्यांची मनधरणी सुरू असली तरी, याबाबत पक्षाने तसा आदेश दिला नसल्याचे भालेराव यांचे म्हणणे आहे.
रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांच्या आदेशान्वये मी निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे उमेदवारी मागे घेण्याचा आदेश ते देणारच नाहीत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेलाही ते येणार नसल्याचे भगवान भालेराव यांनी सांगितले. यदाकदाचित, मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातर ते सभेला आलेच, तरी रामभाऊ तायडे किंवा मला उमेदवारी अर्ज मागे घ्ोण्यास ते सांगणार नाहीत, असा दावाही भालेराव यांनी केला.
दरम्यान, उल्हासनगरातील गोलमैदान येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदींसह युतीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सभेच्या निमित्ताने रिपाइंची बंडखोरी मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. त्यानुसार, रिपाइंचे सर्वेसर्वा रामदास आठवले हे सभेला यावेत आणि त्यांच्याकडूनच हा विषय मार्गी लावावा, यासाठी भाजपच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उमेदवारांच्या सोयीसाठी आठवलेंकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ?
मुख्यमंत्र्यांच्या बहुतांश सभांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची हजेरी असते. मग, उल्हासनगरमध्येच का नाही, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. उल्हासनगर मतदारसंघातील रिपाइंचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव व अंबरनाथ मतदारसंघातील रामभाऊ तायडे यांना अडसर नको, म्हणून रामदास आठवले हे मुख्यमंत्र्यांच्या सभेला येणे जाणीवपूर्वक टाळत असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लक्ष
शहरात धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी व वाढीव चटईक्षेत्राचा प्रश्न उल्हासनगरात उभा ठाकला आहे. धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीला चार चटईक्षेत्र दिले. मात्र, शासन आदेशानुसार बेकायदा इमारती नियमित करण्यासाठी आकारला जाणारा दंड मोठा असल्याने, दंडाअभावी अध्यादेशाची प्रक्रिया पुन्हा ठप्प पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री काय घोषणा करतात, याकडे उल्हासनगरवासीयांचे लक्ष लागले आहे.