Maharashtra Election 2019 : युतीत ठिणगी तर राष्ट्रवादीला ‘मनसे’ टाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 06:33 AM2019-10-08T06:33:02+5:302019-10-08T06:33:06+5:30

शिवसेना-भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर मतदारसंघासह कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा आणि मुरबाड मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसेने एकमेकांना टाळी दिल्याची चर्चा आहे.

Maharashtra Election 2019: burst in the alliance of bjp-sena, NCP with MNS | Maharashtra Election 2019 : युतीत ठिणगी तर राष्ट्रवादीला ‘मनसे’ टाळी

Maharashtra Election 2019 : युतीत ठिणगी तर राष्ट्रवादीला ‘मनसे’ टाळी

googlenewsNext

- नारायण जाधव

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतील लढतींचे चित्र माघारीनंतर सोमवारी स्पष्ट झाले असून यात चार मतदारसंघांत युतीत ठिणगी पडली आहे. तर, पाच मतदारसंघांत मनसे आणि राष्ट्रवादीने एकमेकांना टाळी दिली असून अंबरनाथमध्ये काँगे्रस अन् राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाली आहे.
शिवसेना-भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर मतदारसंघासह कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा आणि मुरबाड मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसेने एकमेकांना टाळी दिल्याची चर्चा आहे.
तर, युतीच्या स्थानिक नेत्यांनी मातोश्रीवरून आलेला उद्धव ठाकरेंचा आदेश आणि ‘वर्षा’वरून आलेला देवेंद्र फडणवीस यांचा संदेश अव्हेरून चार मतदारसंघांत बंडाचे निशाण फडकावून एकमेकांविरुद्ध बिगुल वाजवला आहे.
ऐरोलीच्या बदल्यात कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला. या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना तिकीट नाकारले. यामुळे नाराज पवार यांनी बंड करून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांना आव्हान दिले आहे. ‘वर्षा’वरून आलेला संदेशही त्यांनी अव्हेरला की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा पवार यांच्या बंडाला छुपा पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणारे विश्वनाथ भोईर यांच्या उमेदवारीला ठाण्यातील शिवसेना नेत्यांचा फारसा पाठिंबा नसल्याची चर्चा आहे. कल्याण पश्चिममधून प्रकाश पाटील यांना उमेदवारी मिळावी, याकरिता प्रयत्न सुरू होते. मात्र, स्थानिक शिवसैनिकांनी एकमत करून भोईर यांचे नाव उमेदवारीकरिता थेट मातोश्रीकडे दिले. त्यामुळे नाराज सेना नेतृत्वाची तर पवार यांच्या बंडाला फूस नाही ना, अशी शंका भाजपच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे. पवार यांच्या उमेदवारीचा बदला म्हणून भाजपचे कल्याण पूर्वेतील उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगरचे शिवसेना नेते धनंजय बोडारे यांनी बंडाचा झेंडा फडकाविला आहे. बोडारे यांचे बंड शमवण्याकरिता शिवसेनेतून फारसे प्रयत्न झाले नाहीत, असे बोलले जाते. त्यामुळे पवार हे आपला अर्ज मागे घेण्याकरिता गेले असताना बोडारे यांचे बंड कायम असल्याची खबर मिळाल्याने त्यांनी अर्ज मागे न घेताच माघार घेतली. नवी मुंबईच्या बेलापूरमध्येही भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात शिवसेनेचे विजय माने यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरून स्थानिक श्रेष्ठींच्या आदेशानुसार बंड कायम ठेवल्याची चर्चा आहे.

गीता जैन यांना श्रेष्ठींचे बळ
मीरा-भार्इंदरमध्ये भाजपचे दबंग आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाच्या माजी महापौर गीता जैन यांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरल्यानंतरही श्रेष्ठींकडून त्यांना माघारीचा कोणताही संदेश न आल्याने त्यांनी आपली बंडखोरी कायम ठेवून मेहतांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे गीता जैन यांचा भाजपमधील बोलविता धनी कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे.
अशी आहे मनसे खेळी
युतीचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुहास देसाई यांनी माघार घेऊन मनसेच्या अविनाश जाधव यांना टाळी दिल्याची चर्चा आहे. त्यातच मनसेने मुंब्रा-कळव्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्यासह मुरबाडमधील प्रमोद हिंदुराव आणि कल्याण पूर्वेत प्रकाश तरे यांच्याविरोधात उमेदवारच उभे केलेले नाहीत. अशाच प्रकारे राष्ट्रवादीनेही कल्याण ग्रामीणमध्ये राजू ऊर्फ प्रमोद पाटील यांच्याविरोधात उमेदवार दिलेला नाही. येथे राजू पाटील यांच्यामागे लोकसभेला केलेल्या सहकार्यामुळे ठाण्यातील नेत्यांचे पुत्रप्रेमही कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळेच सुभाष भोईर यांच्यावर एबी फार्म भरूनही माघार घेण्याची पाळी आल्याची शिवसैनिकांत चर्चा आहे.
राष्ट्रवादी आणि मनसेने एकमेकांना दिलेल्या या टाळीमागे पक्षाचे नेते अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यातील समझोता असल्याचे ऐकायला मिळत आहे.
मात्र, अंबरनाथमध्ये काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाली असून काँग्रेसचे रोहित साळवे यांच्याविरोधात प्रमोद हिंदुराव यांचे समर्थक असलेल्या प्रवीण खरात यांनी बंड पुकारले आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: burst in the alliance of bjp-sena, NCP with MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.