Maharashtra Election 2019: कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसैनिकांच्या बंडखोरीला एकनाथ शिंदेंचे बळ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 10:56 AM2019-10-18T10:56:23+5:302019-10-18T11:01:42+5:30
कल्याण पूर्व विधानसभा निवडणूक २०१९ - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांनी भाजपात प्रवेश करत भाजपाची उमेदवारी घेतली आहे.
कल्याण - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात युतीत लढणाऱ्या शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षात अंतर्गत कुरघोडी करण्याचा प्रयत्नही सुरु आहे. कणकवलीमध्ये भाजपा अधिकृत उमेदवारासमोर शिवसेनेनेही अधिकृत उमेदवार दिला आहे. तर नाशिक पश्चिममध्येही शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजीनामा देत बंडखोर अपक्ष उमेदवाराच्यामागे बळ दिलं आहे. तसेच काहीसं चित्र ठाणे जिल्ह्यातही पाहायला मिळत आहे.
कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व या दोन्ही मतदारसंघावरून सुरुवातीला शिवसेना-भाजपात रस्सीखेच सुरु होती. अखेर युती झाल्याने कल्याण पश्चिमची जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडली मात्र याठिकाणी विद्यमान भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत युतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे कल्याण पूर्वमध्ये भाजपा महायुतीकडून लढणारे उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक धनंजय बोडारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपा-शिवसेना महायुती उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी उघडपणे अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांचा प्रचार करताना दिसत आहे. तसेच धनंजय बोडारे यांच्या प्रचाराच्या पोस्टर्सवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटोही झळकताना दिसत आहे. कल्याण पूर्व मतदारसंघात गणपत गायकवाड गेली २ टर्म अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांनी भाजपात प्रवेश करत भाजपाची उमेदवारी घेतली आहे. गणपत गायकवाड यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. कल्याण पूर्व मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत या जागेवर अवघ्या ७०० मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. अशातच यंदाच्या निवडणुकीत युती झाल्यामुळे शिवसेनेला ही जागा सोडण्यात यावी अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी केली होती. मात्र ही जागा भाजपाला गेल्याने अनेक नाराज शिवसैनिकांनी बंडखोरी करत धनंजय बोडारे यांच्या माध्यमातून गणपत गायकवाड यांच्यापुढे कडवं आव्हान उभं केलं आहे. मात्र शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी युतीधर्माचं पालन करत नसल्याने भाजपा पदाधिकारीही नाराज झाले आहेत. या बंडखोरीमागे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे पाठबळ तर नाही ना? अशी शंका भाजपा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येते. किंबहुना इतर भागात बंडखोरांवर कारवाई होत असताना कल्याण पुर्वमध्ये कोणत्याही शिवसेनेच्या नगरसेवकांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
काय म्हणतात एकनाथ शिंदे?
काही शिवसैनिक व नगरसेवकांनी बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारात उतरण्याकरिता राजीनामे दिले आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही फरक पडत नाही. त्यांच्याविरोधात ठाकरे हेच योग्य ती कारवाई करतील. जो सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाची शिस्त व आदेश पाळतो, त्यानुसार काम करतो तोच शिवसेना व भाजपमध्ये मोठा होऊ शकतो असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.