Maharashtra Election 2019 : गणपत गायकवाड यांनी भरला उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 01:19 AM2019-10-04T01:19:13+5:302019-10-04T01:19:36+5:30
कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार गणपत गायकवाड यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार गणपत गायकवाड यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. जागावाटपात हा मतदारसंघ वाट्याला न आल्याने शिवसैनिक बंडाच्या पवित्र्यात असले तरी, गायकवाड यांचा अर्ज दाखल करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि माजी महापौर रमेश जाधव यांनी उपस्थिती लावली होती.
गायकवाड हे याच मतदारसंघातून सलग दोनवेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. मधल्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गायकवाड यांनी पूर्वेतील तिसगावनाका येथून निवडणूक कार्यालयापर्यंत मोठी रॅली काढली. रॅलीमुळे कल्याण पूर्वत वाहतूककोंडी झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
२०१४ मध्ये विरुद्ध, आता मात्र साथ-साथ
२०१४ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे गोपाळ लांडगे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी १० उमेदवार रिंगणात होते. परंतु, प्रत्यक्षात लढत गायकवाड आणि लांडगे यांच्यातच झाली होती. यात गायकवाड यांनी अवघ्या ७४५ मतांनी लांडगे यांचा पराभव केला होता. दरम्यान, आता भाजपचे उमेदवार गायकवाड असून त्यांचा अर्ज भरण्यासाठी लांडगे यांनी उपस्थिती लावली होती.
पाच जणांचे अर्ज : पूर्व मतदारसंघात आतापर्यंत पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी बालाजी गायकवाड (अपक्ष), हरिश्चंद्र पाटील (संघर्ष सेना) या दोघांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी गणपत गायकवाड (भाजप), सचिन चिकणे (समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक), अभिजित त्रिभुवन ( बहुजन मुक्ती पार्टी) यांनी अर्ज दाखल केले.