Maharashtra Election 2019 : शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाडांचे शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 01:28 AM2019-10-04T01:28:25+5:302019-10-04T01:28:47+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी मुंब्य्रात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Maharashtra Election 2019: Jitendra Awhad file nomination in the presence of Sharad Pawar | Maharashtra Election 2019 : शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाडांचे शक्तिप्रदर्शन

Maharashtra Election 2019 : शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाडांचे शक्तिप्रदर्शन

Next

ठाणे / मुंब्रा : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी मुंब्य्रात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सुमारे दीड तास भरउन्हात निघालेल्या रॅलीत शरद पवार रथावर स्वार झाले होते. परंतु, अर्ज न भरताच आव्हाड कार्यालयातून बाहेर पडले. ते शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एखाद्या नवतरुणाला लाजवेल इतक्या ताकदीनिशी ८० वर्षीय पवार रॅलीत सहभागी झाले होते. त्यांना पाहण्यासाठी मुंब्य्रातील नागरिकांनी एकच गर्दी केली. त्याचबरोबर पवार ज्या-ज्या चौकातून जात होते, तेथे त्यांचे आतषबाजीने स्वागत केले गेले. या रॅलीमुळे मुंब्रा-कौसा याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

मुंब्रा-कळवा मतदारसंघातून अद्यापही युतीने उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यातच गुरुवारी आव्हाड यांनी पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणूक रॅली काढून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या रॅलीसाठी आणलेल्या रथावर पवार स्वार झाले. ढोलताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज भरणाऱ्यासाठी आव्हाड निघाले होते. रॅली कौसा स्टेडिअमपर्यंत पोहोचल्यानंतर पवारांसह आव्हाड निवडणूक कार्यालयात गेलेही. मात्र, तेथून अर्ज न भरताच ते बाहेर पडले. भरउन्हात काढलेल्या रॅलीमुळे दमलेले नगरसेवक कार्यालयात आले नाही. या रॅलीत कन्हैय्या कुमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा ठामपाचे गटनेते नजीब मुल्ला, प्रदेश चिटणीस सुहास देसाई, महिला अध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष मोहसीन शेख, कळवा-मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान, शानू पठाण आदी उपस्थित होते.

आ. आव्हाड भावुक
एका बापाने आपल्या पोरासाठी जे करावे, ते पवारांनी माझ्यासाठी केले. एका कार्यकर्त्यासाठी वयाच्या ८० व्या वर्षी काय-काय करतो, हा माणूस. हे आज अख्ख्या महाराष्ट्राला कळले. ज्यांनी-ज्यांनी पवारांना मागच्या दोन महिन्यांत त्रास दिलाय, त्यांना ही जनता सोडणार नाही. त्याचा बदला महाराष्ट्रातील तमाम आयाबहिणी आणि तरु णवर्ग घेईल, अशा शब्दांत भावना व्यक्त करताना आ. आव्हाड यांच्या डोळ्यांत
अश्रू तरळले होते.

Web Title: Maharashtra Election 2019: Jitendra Awhad file nomination in the presence of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.