Maharashtra Election 2019: शिवसेना उमेदवार दीपाली सय्यदसाठी जितेंद्र आव्हाडांनी गायलं 'स्पेशल' गाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 03:09 PM2019-10-04T15:09:57+5:302019-10-04T15:11:47+5:30
कळवा-मुंब्रा विधानसभा निवडणूक 2019 - गेल्या दहा वर्षात मुंब्रा परिसराचा विकास झाला नाही. लोकांना परिवर्तन पाहिजे ,आणि ज्या ठिकाणी आव्हान त्या ठिकाणी दीपाली असते अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यदने व्यक्त केली.
ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून विविध पक्षांचे उमेदवार निवडणुकीचा अर्ज दाखल करत आहे. कळवा-मुंब्रा या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून जितेंद्र आव्हाड निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना कळवा-मुंब्रा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे येथील सामना चांगलाच रंगतदार होणार असल्याचं पाहायला मिळेल.
तसेच आज दिपाली सय्यद यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या दहा वर्षात मुंब्रा परिसराचा विकास झाला नाही. लोकांना परिवर्तन पाहिजे ,आणि ज्या ठिकाणी आव्हान त्या ठिकाणी दीपाली असते, अशी पहिली प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांनी दिली आहे. मी चेंबूरची आहे आणि तेव्हा पासून मी शिवसेनेच्या जवळ आहे. त्यांनीच मला प्लँटफॉर्म दिला होता त्यामुळे मी अभिनेत्री झाली,मला आनंद होत आहे की मी सेनेत आहे,आणि त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असे दीपालीने सांगितले.
दरम्यान, लोकशाहीत विरोधक अनपेक्षित नसतो, सक्षम विरोधक असायलाच हवा. दिपाली सय्यद माझी बहिण शिवसेनेकडून येतेय, तिलाही प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहेत. पुढील 15 दिवसांत लोकं निर्णय घेतली त्यांना जितेंद्र आव्हाड पाहिजे की दिपाली सय्यद, अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे
इतकचं नाही तर, 15 दिवस आलेली आमची माहेरवासिण बहिण दिड लाखांच्या फारकाने तिला सासरी पाठविण्याची व्यवस्था येथील जनता करेल. यावेळी आव्हाड यांनी दीपाली सय्यद यांच्यासाठी खास गाणे गाऊन दीपाली सय्यद यांना टोला लगावला. “बाबुल की दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. मयके की कभी ना याद आये, ससुराल मे इतना प्यार मिले” हे गाणं गात आव्हाडांनी पंधरा दिवसांसाठी आलेली आमची माहेरवाशीण बहीण आमच्या मानवी धर्माप्रमाणे तिचं खूप औक्षण होईल, तिला खूप माया दिली जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.