जितेंद्र आव्हाड विरुद्ध दीपाली सय्यद यांच्यात मुंब्रा-कळवा मतदारसंघात रंगणार सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:03 AM2019-10-05T03:03:09+5:302019-10-05T03:04:02+5:30
मुंब्रा-कळवा मतदारसंघातून अखेर शिवसेनेने मराठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिल्यामुळे आता येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
ठाणे : मुंब्रा-कळवा मतदारसंघातून अखेर शिवसेनेने मराठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिल्यामुळे आता येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. दीपाली या माहेरवाशीण म्हणून आल्या असून त्यांचे पुढील १५ दिवस लाड पुरवून त्यांच्याविरुद्ध दीड लाखाचे मताधिक्य घेऊन त्यांना सासरी पाठवले जाईल, असे टोणपे राष्टÑवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी लगावले आहेत.
मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेनेकडून अनेक जण इच्छुक होते. मात्र, या सर्वांच्याच इच्छेवर अखेर श्रेष्ठींनी पाणी फिरवून गुरुवारी रात्री दीपाली सय्यद यांना शिवसेनेत प्रवेश देऊन दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्जदेखील भरला. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमनेदेखील अनिल भगत यांना संधी दिली आहे. तर, एमआयएमने बरक्तुला एली हसन शेख यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, ते किती मते खाणार, यावर शिवसेनेचे भवितव्य निश्चित होणार आहे.
शिवसेनेकडून राजेंद्र साप्ते, सुधीर भगत, प्रदीप जंगम आदींसह इतर दोन नावे चर्चेत होती. परंतु, त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. विशेष म्हणजे कल्याण ग्रामीणचे उमेदवार असलेले सुभाष भोईर यांनी या मतदारसंघातून लढावे, अशी पक्षाची इच्छा होती. मात्र, त्यांनीदेखील येथून लढण्यास नकार दिला. त्यामुळे अवघ्या एका रात्रीत मुंबईतून आयात करून शिवसेनेने दीपाली यांना उमेदवारी दिली. त्यांची तशी मराठी सिनेमांमध्ये फारशी छाप दिसलेली नसली, तरी निवडणुकीत त्या किती छाप सोडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आव्हाडांनी उडवली खिल्ली, तर दीपालीने केली टीका
दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी मात्र दीपाली यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. मतदानाच्या निकालाच्या दिवशी घराघरांमध्ये एकच गाणे वाजणार आहे, बाबूल की दुवाई लेती जा, जा तुजको सुखी संसार मिले, मयके की तुझे ना याद आहे, सध्या त्या माहेरवाशीण आहेत. त्यांचे १५ दिवस लाड करून परत घरी पाठवायचे आहे, असा टोला त्यांनी गाणे म्हणत लगावला आहे. तर, मुंब्रा भागात विकास झाला नाही, असा आरोप दीपाली यांनी केला आहे. त्यावर, त्या ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी विकासच करतात, असा पलटवार आव्हाडांनी केला आहे.