Maharashtra Election 2019: ईव्हीएमवर शाईफेक करणाऱ्यास सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 03:08 AM2019-10-23T03:08:03+5:302019-10-23T06:10:12+5:30
Maharashtra Election 2019: वैद्यकीय कारण; जामीन घेण्यासही दिला नकारMaharashtra Election 2019:
ठाणे : मतदान केंद्रामधील ईव्हीएमवर शाई फेकणारे सुनील खांबे यांच्याविरोधात सुरुवातीला प्रतिबंधात्मक कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होण्यापूर्वी त्यांनी जामीन घेण्यास नकार दर्शवला. त्यातच, त्यांना बीपी आणि मधुमेहाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करता सोडून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मंगळवारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे आंदोलन करून खांबे यांना संरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
सोमवारी मतदानाच्या दिवशी सुनील खांबे यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मतदानकेंद्रावर जाऊन मतदान केल्यानंतर त्यांच्याकडे असलेली शाई ईव्हीएम मशीनवर फेकली होती. त्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून ठाणेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. याचदरम्यान,खांबे यांच्याविरोधात क्षेत्रिय अधिकारी कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. तो दाखल होण्यापूर्वी त्यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने आणि त्यांना बीपी आणि मधुमेहाचा त्रास जाणवण्यास लागल्याने पोलिसांनी त्यांना अटक न करता सोडून दिले. तसेच त्यानंतर ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले असावेत, असे पोलिसांनी सांगितले.