भाजपचे नरेंद्र पवार यांची बंडखोरी, दाखल केली अपक्ष उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 01:29 AM2019-10-05T01:29:45+5:302019-10-05T01:30:10+5:30
युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांचा पत्ता कट झाला.
कल्याण : युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांचा पत्ता कट झाला. शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाकडून फेरविचार न झाल्याने पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपविरोधात बंडखोरी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांचे समर्थक भाजपचे झेंडे घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. त्यामुळे, पवार यांचे बंड भाजपविरोधात नसून शिवसेना उमेदवाराविरोधात असल्याचे उघड झाले.
पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पक्षाकडून त्यांची मनधरणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवार उमेदवारी कायम ठेवणार की नाही, हे ७ सप्टेंबर रोजी दुपारनंतर स्पष्ट होणार आहे. पवारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला डोकेदुखी झाली आहे. तूर्तास पवार यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एक अपक्ष म्हणून, तर दुसऱ्या अर्जावर भाजपचा उल्लेख केला आहे.
शिवसेनेतर्फे कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांनीही शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मनसेतर्फे तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले माजी आमदार प्रकाश भोईर यांनीही अर्ज दाखल केला. काँग्रेसतर्फे कांचन कुलकर्णी यांनी तर, राष्ट्रवादीतर्फे रमेश हनुमंते यांनी अर्ज दाखल केले. हनुमंते यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आमची मैत्रीपूर्ण लढत असल्याचे सांगितले.
शाळकरी विद्यार्थी वेठीस : नरेंद्र पवार आणि विश्वनाथ भोईर यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे कल्याणच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती. या शक्तिप्रदर्शनाने रुग्णवाहिकेसह विद्यार्थ्यांनादेखील वेठीस धरले होते. आधीच खड्ड्यांनी त्रस्त असलेले नागरिक कोंडीमुळे आणखीनच त्रस्त झाले होते.