Maharashtra Election 2019: शिवसेना खासदाराची सिटी बँक बुडाली; आता खातेदारांनी काय करावं?- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 08:43 PM2019-10-12T20:43:43+5:302019-10-12T20:56:59+5:30

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी युती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Maharashtra Election 2019: raj thackeray criticize on citi bank shivsena mp | Maharashtra Election 2019: शिवसेना खासदाराची सिटी बँक बुडाली; आता खातेदारांनी काय करावं?- राज ठाकरे

Maharashtra Election 2019: शिवसेना खासदाराची सिटी बँक बुडाली; आता खातेदारांनी काय करावं?- राज ठाकरे

Next

मुंबईः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी युती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे खासदार सिटी को. ऑपरेटिव्ह बँक चालवत आहेत आणि बँक बुडल्यावर खातेदार भगिनी त्या शिवसेनेच्या खासदारांना भेटायला गेले तर ते म्हणाले, मी काही करू शकत नाही, मरायचं तर मरा, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. ते भिवंडीतल्या मनसेच्या सभेत बोलत होते. 

पुढे ते म्हणाले, आज पीएमसी आणि सिटी को. ऑपरेटिव्ह बँकेचे खातेदार आले होते, त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत, आज बँका बुडत आहेत, उद्योग बुडत आहेत, तरीही आपल्याला राग येत नाही, व्यवस्थेला जबाबदार धरावेसे वाटत नाही. भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय बंद पडतोय, देशात पण अनेक उद्योगधंदे पडत आहेत आणि आपण काहीच वाटून घेत नाही आहोत, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. भिवंडीमधील विजेचा प्रश्न, टोरेंट नावाची कंपनी गुजरातमधून आली आणि तिने लुटायला सुरुवात केली. भिवंडीकरांनी भाषणांना टाळ्या द्यायच्या ऐवजी ती एक टाळी टोरेंटच्या अधिकाऱ्याच्या गालावर मारली तर परिस्थिती सुधारेल, असंही त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

आज महाराष्ट्रात नाशिक वगळता सर्वत्र खड्डे आहेत. नाशिकमध्ये आपल्या सत्तेच्या काळात आम्ही टक्केवारी बंद केली आणि त्यामुळे रस्त्यांवर खड्डे नाही पडले. तेच कंत्राटदार होते जे आधीपण होते, पण कंत्राटदारांनी नाशिकमध्ये आमच्या काळात रस्ते चांगले बांधले कारण आम्ही टक्केवारी बंद केली. जर तीच तीच माणसं सत्तेत निवडून आली तर त्यांना भीती कधी वाटणार की, आपण काम नाही केलं तर लोकं आपल्याला निवडून नाही देणार. जे आधी विरोधी पक्षात होते तेच आता सत्ताधारी गोटात जाऊन बसले आहेत, जो पर्यंत हे दलबदलू हरणार नाहीत तो पर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, असंही राज ठाकरेंनी म्हणत जनतेला परिवर्तनाचं आवाहन केलं आहे.  

Web Title: Maharashtra Election 2019: raj thackeray criticize on citi bank shivsena mp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.