उल्हासनगर, मीरा रोड, कल्याणमध्ये बंडाचे झेंडे, भाजप-शिवसेनेत असंतोष उफाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 02:09 AM2019-10-05T02:09:57+5:302019-10-05T02:10:34+5:30
भाजप व शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत युती केली असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंडाचे झेंडे फडकले आहेत.
ठाणे : भाजप व शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत युती केली असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंडाचे झेंडे फडकले आहेत. कल्याण पश्चिममध्ये भाजपचे विद्यमान आ. नरेंद्र पवार यांनी, तर कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे विद्यमान आ. सुभाष भोईर यांनी बंड केले आहे. मीरा रोडमध्ये भाजपने आ. नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिल्याने माजी महापौर गीता जैन यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली, तर उल्हासनगरमध्ये भाजपने कलानी कुटुंबाला उमेदवारी नाकारल्याने ज्योती यांच्यापाठोपाठ ओमी यांनीही राष्ट्रवादीतर्फे अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीचे तीन उमेदवार झाले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तोपर्यंत शिवसेना-भाजपचे नेते किती बंडखोरांना थंड करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर निवडणुकीत युती नको, अशी मागणी भाजप व शिवसेनेतून केली जात होती. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभेतील युतीची घोषणा झाली असल्याने दोन्ही पक्षांनी युती केली. त्यामुळे दोन्ही पक्षांत असंतोष उफाळून आला आहे. बेलापूर मतदारसंघ राखण्याच्या बदल्यात कल्याण पश्चिम शिवसेनेला सोडल्याने नाराज झालेल्या नरेंद्र पवार यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला. पवार यांनी भाजप व अपक्ष या नात्याने दोन अर्ज दाखल केले असून त्यांच्या मिरवणुकीत भाजपचे झेंडे होते. त्यामुळे पवार यांच्या बंडाला भाजपची फूस असल्याची चर्चा आहे. आपण शिवसेनेच्या विरोधात अर्ज दाखल केला असून भाजप नेतृत्वावर नाराज नसल्याचे पवार यांनी सांगितल्याने तर या संशयाला पुष्टी मिळाली आहे. पवार यांचे बंड शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांना डोकेदुखी ठरू शकते.
कल्याण पूर्ण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेचे धनंजय बोडारे यांनी अर्ज दाखल केला आहे. गायकवाड यांचा अर्ज दाखल करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व अन्य नेते हजर होते. मात्र, तरीही बोडारे यांनी अर्ज दाखल केल्याने कल्याण पश्चिमेतील नरेंद्र पवार यांच्या बंडानंतर भाजपवरील दबाव वाढवण्याकरिता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावरून तर बोडारे यांनी अर्ज दाखल केला नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पवार यांनी माघार घेतली, तरच बोडारे हेही माघार घेतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
कल्याण ग्रामीण, उल्हासनगरातही वाद
कल्याण ग्रामीणसाठी रमेश म्हात्रे यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यापूर्वी शिवसेनेने विद्यमान आ. सुभाष भोईर यांना ए व बी फॉर्म दिले होते. मात्र, भोईर नव्हे तर म्हात्रे हेच अधिकृत उमेदवार असल्याची माहिती खा. शिंदे यांनी गुरुवारीच दिली होती. पालकमंत्री शिंदे व भोईर यांच्यातील तणावपूर्ण संबंधातून हे बंड उभे ठाकले आहे. पालकमंत्री शिंदे यांचा विरोध असतानाही, सुभाष भोईर यांना ए व बी फॉर्म कसा मिळाला व आता शिंदे यांच्या शब्दाखातर उमेदवार कसा बदलला गेला, याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला रसद पुरवण्याची क्षमता शिंदे यांच्यामध्ये असल्याने त्यांचा शब्द ‘मातोश्री’वर डावलण्यात आला नाही, असे बोलले जाते.
उल्हासनगरात भाजपने पंचम कलानी यांच्याऐवजी कुमार आयलानी यांना उमेदवारी दिल्याने ओमी कलानी यांनी अर्ज दाखल केला. यापूर्वी त्यांच्या मातोश्री ज्योती यांनी अर्ज दाखल केला आहे. या दोघांना राष्ट्रवादीने ए व बी फॉर्म दिले आहेत. भरत गंगोत्री यांनाही राष्ट्रवादीने ए व बी फॉर्म दिले आहेत. सध्या येथे राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांकडे एबी फॉर्म आहेत.
मीरा रोडमध्ये आ. नरेंद्र मेहता यांच्याविरोधात माजी महापौर गीता जैन यांनी अर्ज दाखल केला. काँग्रेसतर्फे मुझफ्फर हुसेन यांनी अर्ज भरला असल्याने येथे तिरंगी लढतीची दाट शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत ३०० उमेदवारांचे ३७० अर्ज दाखल झाले आहेत.